२० टक्के अनुदान प्राप्त असलेल्या शाळेतील शिक्षकांचे सुधारित नियमानुसार वेतन करण्याची मंजुरी देण्यासाठी आठ लाख रूपयांची लाच स्वीकारल्यामुळे शिक्षणाधिकारी डॉ. झनकर यांच्यासह प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते आणि वाहनचालक ज्ञानेश्वर येवले यांना ताब्यात घेण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयात १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ही कारवाई झाल्यापासून प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांची प्रतीक्षा होती.
डॉ. झनकरांच्या निलंबनाचा निर्णय होत नसल्याने प्रभारी नियुक्ती झाली नसल्याचं कारण शिक्षण विभागाने पुढे केलं. मात्र, शिक्षणाधिकाऱ्यांअभावी रखडलेले वेतनासह विविध प्रकारच्या मान्यतेसह शासकीय कामकाज ठप्प झालं आहे. त्यामुळे शिक्षण खात्याच्या कार्यवाहीतील दिरंगाईचा मुद्दा ‘मटा’ने अधोरेखित करत ‘शिक्षणाधिकारी मिळेल?’ या मथळ्याखाली शुक्रवारी (दि.२०) वृत्त प्रसिध्द केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शनिवारी (दि.२१) पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हास्तरीय आढावा बैठकीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लीना बनसोड यांना या प्रकरणी विचारणा केली.
झनकरांचे निलंबन आणि प्रभारी नियुक्ती होईल तेव्हा होईल, तत्पूर्वी शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावा, असे निर्देश देण्यात आले. एकीकडे पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला खडेबोल सुनावले, तर दुसरीकडे पुण्यातील शिक्षण विभागाच्या कार्यालयातून प्रभारी शिक्षणाधिकारी नियुक्तीची कार्यवाही पूर्ण झाली. त्यानुसार नाशिकमध्ये सहाय्यक शिक्षण संचालक पदावर असलेल्या पुष्पावती पाटील यांच्याकडे सोमवारपासून (दि.२३) शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार असणार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या प्रलंबित वेतनासह झनकरांनी रोखून धरलेले प्रस्ताव आणि इतर शैक्षणिक कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
निलंबन सोमवारी होणार?
१३ ते १७ ऑगस्ट पोलीस कोठडी आणि १८ ते २२ ऑगस्टपर्यंत झनकर या मध्यवर्ती कारागृहात आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई होऊन १३ दिवस, तर कोठडीत त्या १० दिवस आहेत. कोठडीत ४८ तास झाल्यावर लागलीच त्यांचे निलंबन होणं अपेक्षित होतं. परंतु, उपसंचालकांकडून दोन वेळा शिस्तभंग व निलंबनाचा प्रस्ताव सादर होऊनही शिक्षण आयुक्तांनी झनकरांचे निलंबन केलेलं नाही. गेल्या आठवड्यातल्या सलग सुट्यांमुळे विलंब झाल्याचा दावा शिक्षण खात्याकडून होत आहे. मात्र, झनकरांच्या निलंबनातील दिरंगाईमागे काहीतरी गौडबंगाल असल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात सुरू आहे. आता प्रभारी शिक्षणाधिकारी नेमल्याने, सोमवारी (दि.२३) झनकरांचे निलंबन होण्याची शक्यता आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times