रोहित मधुकर गोसावी (वय ३५, रा. वाल्मिकी आवास) असं जखमी सराईत गुन्हेगाराचं नाव आहे. पोलिसांनी त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित रोहित गोसावी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात चोरी, मारामारीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक रेकॉर्डवर असलेल्या आरोपींच्या शोधात होते. एका गुन्ह्याच्या तपासासाठी गोसावी याचाही पोलिसांकडून शोध सुरू होता.
शनिवारी रात्री उशिरा गोसावी हा मारुती रोडवरील पंचशील साडी दुकानासमोर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी दीपक गट्टे यांच्यासह पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले. पोलिसांना पाहताच तो पळून जाऊ लागला. थोड्या अंतरावर गेल्यानंतर त्याने त्याच्याकडे लपवलेले ब्लेड काढून स्वत:च्या मानेवर, हातावर, दंडावर वार करून घेतले. अटक टाळण्यासाठी त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.
या प्रकारानंतर पोलिसांनी त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी पोलिसांनी गोसावी याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाई होईल, अशी माहिती सांगली शहर पोलिसांनी दिली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times