: सण साजरा करण्यासाठी बहिणीच्या गावी दुचाकीवरुन जाणाऱ्या भावावर काळाने घाला घातला आहे. परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील कानडखेड इथं ही दुर्दैवी घटना ( Accident) घडली. ज्ञानेश्वर भालेराव (३२) असं या भावाचं नाव असून ते आपल्या भावजयी आणि मुलासह बहिणीच्या गावी जाण्यासाठी निघाले असता हा अपघात झाला.
रक्षाबंधन सणासाठी ज्ञानेश्वर भालेराव हे आपल्या भावजयी आणि मुलासह बहिणीच्या नांदेड जिल्ह्यातील एकदर निळा या गावी जाण्यासाठी निघाले होते. मात्र वाटेतच त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात ज्ञानेश्वर यांच्यासह त्यांच्या ४ वर्षीय मुलानेही प्राण गमावले आहेत. तसंच त्यांच्या भावजयी जखमी झाल्या आहेत.
ज्ञानेश्वर हे पूर्णा तालुक्यातील खुजडा येथील रहिवासी होते. ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसंच पूर्णा तालुक्यातील खुजडा गावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, या अपघाताची नोंद पोलीस स्थानकात करण्यात आली असून याप्रकरणी अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times