काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांची एक बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाष्य केलं आहे. ‘१९ पक्ष एकत्र आले व त्यांनी विरोधी पक्षांची मोट बांधण्यासंदर्भात चर्चा केली. त्या चर्चेतून कोणते फळ हाती लागले हे महत्त्वाचे. लोकशाही आहे म्हटल्यावर चर्चा तर होणारच, पण फक्त चर्चा पे चर्चा नकोत तर देशासमोर एक ठोस कार्यक्रम घेऊन जाणे गरजेचं आहे,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
‘हे उपरे भाजपचा प्रचार करीत फिरत आहेत व वर्षानुवर्षे भाजपच्या पालख्या उचलणारे कार्यकर्ते त्या ‘जत्रे’त येड्याखुळ्यासारखे सामील झाले आहेत, अशी एक गंमत महाराष्ट्रासह देशभरात सुरु असताना विरोधी पक्षांना अधिक विचाराने पावले टाकावी लागतील,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे. १९ राजकीय पक्ष एकत्र आल्याने लगेच मोदींचे सरकार डळमळीत झाले व गेले या भ्रमात राहता येणार नाही. कारण या एकोणिसात अनेक पक्ष असे आहेत की, त्यांचे ओसाड पडके वाडे झाले आहेत. या पडक्या वाड्यांची डागडुजी करुन त्यांना बरे स्वरुप दिल्याशिवाय एकजुटीचे धक्के समोरच्यांना बसणार नाहीत. विरोधकांच्या एकजुटीचे प्रदर्शन करताना त्याची तटबंदी ढिसाळ पायावर असता कामा नये, असा सल्लाही शिवसेनेनं दिला आहे.
‘२०२४ चे लक्ष्य’ वगैरे ठीक आहे, पण मोदी-शहांप्रमाणे हातचलाखीचे काही प्रयोग विरोधकांनाही करावेच लागतील. ‘मोदी नामा’ची जादू उतरली आहे. त्यामुळे २०२४ चा जय-पराजय हा हातचलाखीच्या खेळावरच ठरेल. त्याची तयारी, रंगीत तालीम करावी लागेल, नाहीतर जन आशीर्वादाच्या ‘जत्रा’ लोकांना गुंगीचा मंत्र देऊन पुढे निघतील, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times