मुंबई : आद्य पत्रकार आणि अनुवादक बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्रातर्फे उत्कृष्ट भाषांतरकाराला देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा झाली आहे. करोना संकटामुळे २०१९ व २०२० या वर्षीसाठीचे पुरस्कार जाहीर करता आले नव्हते. आता या दोन्ही वर्षांतील पुरस्कार एकत्रितपणे आज विंदांच्या जन्मदिनी जाहीर करण्यात आले. २०१९ सालचा बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार डॉ. मेघा पानसरे यांनी केलेल्या ‘सोविएत रशियन कथा’ या लोकवाङ्मय गृहाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाला, तर २०२० सालचा पुरस्कार प्रफुल्ल बिडवई लिखित ‘भारतातील डाव्या चळवळींचा मागोवा’ या पुस्तकाच्या भाषांतरासाठी मिलिंद चंपानेरकर यांना जाहीर करण्यात आला.

ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झालेले ज्येष्ठ साहित्यिक गो. वि. उर्फ विंदा करंदीकर यांनी या पुरस्कारासाठी आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राला दिलेल्या देणगीतून हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कारासाठी त्यावर्षीच्या प्रकाशनवर्षासह आधीच्या दोन वर्षातील पुस्तकेही विचारात घेतली जातात.

नेमकी काय आहे पुस्तकांची वैशिष्ट्ये?
‘सोविएत रशियन कथा’ या पुस्तकात सुमारे शंभर वर्षांच्या काळातील रशियन कथांची भाषांतरे केलेली आहेत. डॉ. मेघा पानसरे या रशियन भाषेच्या ३० वर्षे अभ्यासक आहेत आणि त्यांनी ही भाषांतरे थेट रशियनमधून केलेली आहेत. संग्रहासाठी आवश्यक असणारी पार्श्‍वभूमी सांगणारी संक्षिप्त प्रस्तावना, प्रत्येक लेखकाचा कथेआधी परिचय आणि रशियन साहित्याचा एकोणिसाव्या शतकापासून समकालीन साहित्याच्या अवस्थेपर्यंतचा विश्‍लेषक इतिहास सांगणारे परिशिष्ट यांतून जागतिक कथासाहित्याचा अभ्यास करणाऱ्या वा त्यात आस्था असलेल्या मराठी वाचकाला एका भाषेतील कथासाहित्याचा एक पट सापडतो.

‘भारतातील डाव्या चळवळींचा मागोवा’ हा प्रफुल्ल बिडवई लिखित मूळ इंग्रजी ग्रंथ अतिशय साक्षेपाने आणि व्यासंगपूर्ण लिहिलेला असून भारतातील डाव्या विचारांचा ऐतिहासिक आढावा आणि भविष्यातील आव्हानांचे वेधक सूचन यात केलेलं आहे. भारतातील डाव्या चळवळीची विश्वासार्ह, माहितीपूर्ण आणि अंतदृष्टी देणारे हे पुस्तक मिलिंद चंपानेरकर यांनी अतिशय सहज भाषेत मराठीत आणल्याने हा एक महत्त्वपूर्ण वैचारिक ग्रंथ मराठीत भाषांतरित झाला आहे. चंपानेरकरांनी यापूर्वी ‘लोकशाहीवादी अम्मीस दीर्घ पत्र’, ‘गुड मुस्लीम, बॅड मुस्लीम’, ‘ग्रेप्स ऑफ रॉथ’ या गाजलेल्या पुस्तकांसह अनेक पुस्तके भाषांतरित केलेली आहेत.

दरम्यान, या पुस्तकांची निवड प्रफुल्ल शिलेदार, प्रा. सुनंदा महाजन, प्रा. रणधीर शिंदे व डॉ. नीतीन रिंढे यांच्या समितीने केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here