औरंगाबाद : ‘करोनाची परिस्थिती राज्यभरात नियंत्रणात आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेची सध्यातरी शक्यता वाटत नाही. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये,’ अशा शब्दात आरोग्यमंत्री यांनी नागरिकांना दिलासा दिला आहे. मात्र करोना बद्दलचे नियम काटेकोरपणे पाळावेत हे सांगायला देखील ते विसरले नाहीत.

महापालिकेच्या सिल्क मिल कॉलनीमधील आरोग्य केंद्रात राष्ट्रीय क्षयरोज दुरीकरण कार्यक्रमांतर्गत डिजीटल एक्स रे मशीन बसवण्यात आलं आहे, त्याचे लोकार्पण राजेश टोपे यांच्या हस्ते सोमवारी (२३ ऑगस्ट) झाले, यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

करोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल निती आयोगाचा एक अहवाल आला असून सप्टेबर महिन्यात करोनाची तिसरी लाट येऊ शकते, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या बद्दल राजेश टोपे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘निती आयोगाचा तो अहवाल जून महिन्याचा आहे. जून महिन्यातील परिस्थितीच्या आधारे त्यांनी सप्टेबरमध्ये तिसरी लाट येऊ शकते असे भाकीत वर्तवले होते. पण आता राज्यात करोनाची स्थिती नियंत्रणात आहे, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्व तयारी केली आहे. आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य कर्मचारी नियुक्तीचे आदेश दिले आहेत, औषधांची तयारी करुन ठेवली आहे. एका दिवसात दहा लाख ७० हजार जणांचे लसीकरण केले जाऊ शकते, हे दाखवून दिलं आहे, लसीकरणाचा हा एक उच्चांकच आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने घाबरुन जाण्याचे कारण नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालय व राज्याचे आरोग्य मंत्रालय यांच्यात सध्या तरी या बद्दल कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही,’ असं टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

‘तिसरी लाट बालकांसाठी धोकादायक आहे, असा इशारा देण्यात आल्यामुळे बालरोगतज्ज्ञांचा टास्कफोर्स तयार करण्यात आला आहे. या टास्कफोर्सच्या सूचनेनुसार बालकांसाठी स्वतंत्र वॉर्ड, स्वतंत्र स्टाफ, बालकांसाठीचे व्हेंटिलेटर्स याची सर्व तयारी राज्य शासनाने करुन ठेवली आहे,’ अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली.

दरम्यान, यावेळी आमदार अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, ख्वाजा शरफोद्दीन , पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय आदी उपस्थित होते.

फडणवीसांवर जबाबदारी
केंद्र सरकारकडून लशींचा मुबलक पुरवठा होत नाही, त्यामुळे राज्यात लसीकरणाचा वेग मंदावला आहे, असं सांगताना राजेश टोपे म्हणाले, या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमचं बोलणं झालं आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची तुम्ही वेळ घ्या, आपण सगळे मिळून त्यांच्याकडे जाऊ आणि जास्त प्रमाणात लस उपलब्ध करुन द्या अशी विनंती करू, असं फडणवीस यांना सांगितलं. मात्र सध्या त्यांना वेळ नसल्याने काही दिवसांत मीच केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची वेळ घेणार आहे,’ असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here