वाचा:
राणे यांनी मुख्यमंत्र्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यभर राणेंच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राणेंकडून सातत्याने मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली जात आहे. शिवसेनेतील काही मंत्री आणि आमदार नाराज असल्याने ते लवकरच भाजपमध्ये येणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. यावरही शिवसेनेच्या नेत्यांनी नारायण राणे यांचा समाचार घेतला होता. राणे यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यभरातील शिवसैनिक संतापले आहेत. याचे पडसाद सांगलीतही उमटले. सांगलीतील भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयाबाहेर असलेल्या पोस्टरवरील नारायण राणे यांच्या प्रतिमेला शिवसैनिकांनी काळे फासले.
सांगली शहरासह जिल्ह्यातील अन्य ठिकाणी शिवसैनिक नारायण राणे यांच्या विरोधात निदर्शने करण्याचे नियोजन करीत आहेत. राज्यात काही ठिकाणी भाजपच्या कार्यालयांवर हल्ले झाले आहेत. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते प्रतिकार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातून सांगली जिल्ह्यात शिवसैनिक आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने येऊ शकतात. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी भाजपच्या कार्यालयासमोर बंदोबस्त वाढवला आहे.
नाशिकमध्ये गुन्हा दाखल होताच दगडफेक
नाशिकमध्ये शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी राणे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयावर दगडफेक केली आहे. या हल्ल्यात भाजप कार्यालयाच्या काचा फुटल्या आहेत. त्यामुळे सेना-भाजपमधील संघर्ष अधिक चिघळला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times