: केंद्रीय मंत्री यांना वादग्रस्त वक्तव्यानंतर अटक (Narayan Rane Arrest ) करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात तणाव निर्माण होऊ नये, यासाठी मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्ह्यात कोणत्याही प्रसंगी क्षुल्लक कारणावरुन झालेल्या घटनांचे पडसाद उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

जिल्ह्यात २४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपासून ते ३१ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशान्वये अनेक गोष्टींवर बंधने घालण्यात आली आहेत.

नव्या आदेशानुसार जिल्ह्यात कोणते निर्बंध?
रत्नागिरी जिल्ह्यात २४ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या काळात शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदुका, सुरे, लाठ्या अथवा अशा प्रकारची कोणतीही वस्तू घेऊन फिरणे, अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे, दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्रे फेकावयाची साधने बरोबर घेऊन फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे, सार्वजनिकपणे घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजवणे, पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांनी विनापरवानगी एकत्र येणे या कृत्यांना मनाई करण्यात आली आहे.

सदरचे आदेश अंतयात्रा, धार्मिक विधी, धार्मिक मिरवणूक, लग्नसोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी या बाबींना लागू होणार नाही, असंही आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणताही मोर्चा, मिरवणुका तसेच सभा, निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करायचे असल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे आणि अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही, असं जिल्हादंडाधिकारी यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here