: बिहार येथील व्यापाऱ्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. स्थानिक गजानन साखरवाडे यांच्या शेतातील विहिरीच्या पायथ्याशी शेतमालकाला हा मृतदेह आढळून आला असून २२ ऑगस्टच्या सायंकाळी ही हत्या घडली असा अंदाज आहे. या घटनेतील मुख्य आरोपी अद्याप पसार आहे. राकेशकुमार रामदास पासवान रा.लालगंज जिल्हा पाटणा (बिहार) असं मृतकाचे नाव असून तो गुजरात येथे कुटुंबासह राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नांदगाव पेठ पोलिसांना मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान दूरध्वनीद्वारे माहिती मिळाली की एक बेवारस कार दोन दिवसांपासून चिखलात अडकून पडली आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून बेवारस वाहनाची पाहणी केली आणि तेथून हाकेच्या अंतरावर साखरवाडे यांच्या विहिरीच्या पायथ्याशी राकेशकुमार यांचा मृतदेह कुजलेला अवस्थेत आढळून आला.

२२ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान जी.जे.०१,आर.वाय.९३५८ क्रमांकाचे चारचाकी वाहन चिखलात अडकले होते.

साखरवाडे यांच्या शेतातील विहिरीजवळ राकेशकुमार यांच्या डोक्यात मोठा दगड घालून त्यांची हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेह विहिरीत ढकलण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता. परंतु वजन जास्त असल्याने मृतदेह विहिरीवरच सोडून आरोपी तेथून पसार झाला. मृतक गुजरात येथे वास्तव्यास असून दर दोन महिन्यांनी ते लालगंज येथील आपला परिवार व शेती बघण्याकरता वाहनाने जायचे, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

वाहनातून कोण कोण प्रवास करीत होते? महामार्ग सोडून ते वाहन अडगळीच्या मार्गाने कुठे निघाले होते? हत्येचं नेमकं कारण काय? अशा अनेक प्रश्नांनी पोलिसांना संभ्रमात टाकलं आहे. घटनास्थळी पोलीस उपायुक्त साळी, एसीपी डुंबरे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ठोसरे, नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण काळे, एपीआय देसाई यांच्यासह फॉरेन्सिक लॅबची टीम दाखल झाली होती. नांदगाव पेठ पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रविण काळे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

दरम्यान, सदर प्रकरणाचा तपास सुरू केला असून घटनेमागील सत्यता आणि आरोपी लवकरच शोधून काढू, असं पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी सांगितलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here