मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर दाखल झालेले गुन्हे… त्यांना झालेली अटक… कोर्टानं दिलेला जामीन… आंदोलनं आणि आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा खाली बसत असतानाच राणेंचे पुत्र आमदार नीतेश राणे व माजी खासदार नीलेश राणे यांनी पुन्हा एकदा ट्वीट करून शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. ‘करारा जवाब मिलेगा…’ असा सूचक इशारा नीतेश यांनी दिला आहे. त्यामुळं राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हं आहेत. (Nitesh and Nilesh Rane warns )

वाचा:

जन आशीर्वाद यात्रेच्या दरम्यान सोमवारी राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. तसंच, मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली आवाज काढण्याचीही भाषा केली होती. त्यावरून राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले व राणेंवर गुन्हे दाखल करण्यात आले. नाशिक पोलिसांनी तात्काळ कारवाई करत राणेंना अटक केली. दिवसभर धावपळ केल्यानंतर रात्री उशिरा त्यांना जामीन मिळाला. राणेंच्या अटकेनंतर राज्यभर शिवसैनिकांनी जल्लोष केला. राणे कुटुंबीयांवरही टीका केली गेली. आजही ही टीका सुरूच आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातूनही राणेंचा समाचार घेण्यात आला आहे.

वाचा:

या पार्श्वभूमीवर नीतेश राणे यांनी अभिनेता मनोज वाजपेयी याचा एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. ‘सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला जशास तसं उत्तर मिळेल,’ असा इशारा नीतेश यांनी या माध्यमातून शिवसेनेला दिला आहे.

शिवसेनेनं काल केलेली आंदोलनं पश्चिम बंगालप्रमाणेच सरकारपुरस्कृत होती, असा दावा नीतेश राणे यांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. जुहू इथं आंदोलन करणारे युवा सेनेचे कार्यकर्ते या फोटोमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत दिसत आहेत. हा फोटो ट्वीट करून नीतेश राणे म्हणतात, ‘खुद्द मुख्यमंत्री गुंडांचा सत्कार करताहेत. ही महाराष्ट्राची सध्याची स्थिती आहे. राष्ट्रपती राजवट हाच यावर उपाय आहे.’

नीलेश राणे यांनीही नेहमीच्याच पद्धतीनं शेलक्या शब्दांत शिवसेनेवर टीका केली आहे. ‘काल पूर्ण ठाकरे सरकार आणि शिवसेना कामाला लागली, महाराष्ट्रासाठी नाही राणेंसाठी. शिवसेनेचे मुख्यमंत्री, मंत्री, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी टोकाचे प्रयत्न केले. पण, आमचं काही वाकडं करू शकले नाहीत. औकात कळली?,’ असं नीलेश यांनी म्हटलं आहे. ‘काल आमचे जे सहकारी व कार्यकर्ते शिवसेनेला भिडले, त्यांचे मनापासून आभार,’ असंही नीलेश राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here