मुंबईः केंद्रीय मंत्री (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मंगळवारी त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद उफाळला होता. संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरुन भाजप व नारायण राणेंविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी राज्यभरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. यावरुन मनसेनं जोरदार निशाणा लगावला आहे.

नारायण राणे व भाजप विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले होते. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयावर मोर्चा काढला तर, भाजप कार्यकर्तेही राणेंच्या अटकेनंतर रस्त्यावर उतरले होते. दोन्हीकडील कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अनेक भागांत रास्ता रोकोही करण्यात आला होता. राज्यात काल घडलेल्या या अटकनाट्यामुळं मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. त्यामुळं करोना नियमांचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. यावर बोट ठेवतं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्वीट केलं आहे.

‘कालच्या भानगडी मुळे महाराष्ट्राला झालेले फायदे १)डेल्टा, डेल्टा प्लस अस काही नसतं २)घरचंच आंदोलन होत त्यामुळे आपल्यावर खापर फुटू नये म्हणून तिसऱ्या लाटेला सुट्टी ३)सोशल डिस्टनसिंगचा फज्जा पत्रकार विसरले ४)आता आपण करोनाच्या “कानात”आत्मविश्वासाने सांगू शकतो तू संपलास,’ असा टोला संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला लगावला आहे.

राणेंना अटक व जामीन
नारायण राणे यांना मंगळवारी रत्नागिरी पोलिसांनी संगमेश्वर येथून अटक केली. त्यानंतर रायगड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलेल्या राणे यांना महाडला नेण्यात आले. नारायण राणे यांना महाडला नेऊन पोलिसांनी न्यायालयात हजर केले. यावेळी त्यांच्या पत्नी नीलम राणे या देखील न्यायालयात उपस्थित होत्या. नारायण राणे जबाबदार व्यक्ती असताना बेजबाबदारीने वागले, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला, तर राणे यांच्यावर पोलिसांनी लावलेली कलमे चुकीची आहेत. पोलिस तपासासाठी दिलेली कारणे योग्य नाहीत. राणे यांना अटक करण्यापूर्वी पोलिसांनी कोणतीही लेखी नोटीस दिलेली नाही, असा युक्तिवाद राणे यांच्या वकिलांनी केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यावर राणे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here