कोविड लसीचा दुसरा डोस देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेताना ग्रामीण रुग्णालयात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन अरुण शिंदे (वय ३८) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी एका व्यक्तीने तक्रार दिली आहे. तक्रारदार, त्यांचे मित्र आणि कुटुंबातील व्यक्तींनी करोना लसीचा पहिला डोस घेतला होता. दुसऱ्या डोसची तारीख जवळ आल्यामुळे त्यांनी डोसबाबत चौकशी केली. चाकण ग्रामीण रुग्णालय येथे कोविड लसीकरण अंतर्गत मोफत लस दिली जाते. तरीही या रुग्णालयात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या सचिन शिंदे याने लसीचा दुसरा डोस मिळवून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे १८०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) यांच्याकडे तक्रार दिली. त्यानुसार एसीबीने तक्रारीची पडताळणी केली. त्यावेळी त्याने लाच मागितल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले. त्यानुसार गुरुवारी लस देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेताना शिंदे याला अटक करण्यात आली आहे.
आणखी वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times