इंग्लंडने या सामन्यात एकूण ३५४ धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर उपहारापूर्वी भारताला लोकेश राहुलच्या रुपात पहिला धक्का बसला होता. पण त्यानंतर रोहित आणि पुजारा या दोघांनी अर्धशतकी खेळी साकारत संघाला चांगली धावसंख्या रचून दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी रचली. पण रोहित शर्मा यावेळी दुर्देवी ठरला. रोहितने दमदार अर्धशतक साजरे केले, पण रोहितला यावेळी ५९ धावांवरच समाधान मानावे लागले. कारण रोहितला मैदानातील पंचांनी पायचीत बाद दिले. पण रोहितने यानंतर डीआरएसचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये सर्व गोष्टींचा उलगडा झाला. कारण यावेळी रोहितला टाकलेला चेंडू हा ७५-८० टक्क्याहून जास्त स्टम्पला लागत नसल्याचे पाहायला मिळाले. काही वेळा असा चेंडू थेट स्टम्पला लागतो, पण बऱ्याचदा बेल्सही पडत नाही. त्याचबरोबर पंचांनी यावेळी रोहितला पहिल्यांदा बाद दिले आणि त्यामुळेच तिसऱ्या पंचांना यावेळी रोहित आऊट असल्याचा निर्णय द्यावा लागला. पण रोहितला जर मैदानातील पंचांनी बाद दिले नसते तर रोहितला तिसऱ्या पंचांनी नाबाद ठरवले असते.
रोहित बाद झाल्यावरही पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांची चांगली भागीदारची पाहायला मिळाली. पुजारा आणि कोहली यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९९ धावांची अभेद्य भागीदारी रचली आहे. पुजारा यावेळी नाबाद ९१ धावांवर खेळत आहे, पुजाराने ९१ धावांची खेळी साकारताना १५ चौकार फटकावले आहेत. कोहली यावेळी नाबाद ४५ धावांवर खेळत असून त्याच्या नावावर सहा चौकार आहेत. त्यामुळे ही जोडी आता उद्या किती धावा जमवते, यावर भारतीय संघाचे या कसोटीतील भवितव्य अवलंबून असेल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times