मुंबई: राज्यात नव्या इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य करण्यात येणार आहे. राज्याचे गृहमंत्री यांनी आज, विधान परिषदेत ही माहिती दिली. इमारतींमध्ये बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे गृहविभागाच्या सीसीटीएनएस या यंत्रणेशी जोडले जातील, अशी माहितीही त्यांनी दिली.

राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचा मुद्दा विरोधी पक्ष भाजपनं उचलून धरल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली. कायद्यात आवश्यक सुधारणा करून राज्यात उभारणाऱ्या प्रत्येक नव्या इमारतीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात येईल आणि सीसीटीव्ही कॅमेरे गृहविभागाच्या सीसीटीएनएस नेटवर्कशी जोडण्यात येईल, असं सांगितलं. मुंबईत आणखी पाच हजार कॅमेरे नेटवर्कशी जोडण्यात येतील, असंही देशमुख म्हणाले.

पीडित महिलांच्या समुपदेशनाचा मुद्दाही काही सदस्यांनी उपस्थित केला. त्यावर देशमुख यांनी पुणे पोलिसांतर्फे चालवण्यात येणाऱ्या ‘भरोसा’ केंद्राची माहिती दिली. भरोसा केंद्रामधील प्रशिक्षित कर्मचारी पीडितांचे समुपदेशन करत आहेत. अशाच प्रकारचे केंद्र राज्यभरात सुरू करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाहीही देशमुख यांनी दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here