गेल्या काही दिवसांपासून विविध घटनांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच सोलापुरात काँग्रेस भवनावर झालेल्या दगडफेकीची सध्या शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.
जिल्हा परिषद परिसरातील सोलापूर काँग्रेस भवनाच्या समोर सोलापूर शहर काँग्रेस कमिटी आणि एनएसयूआयचे बोर्ड लावण्यात आले आहेत. या बोर्डवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांच्यासह अन्य स्थानिक नेत्यांचे फोटो आहेत. त्यात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांचेही फोटो लावण्यात आले आहेत. याच फोटोंवर अज्ञाताने मध्यरात्री शाई फेकून दगडफेक केल्याची घटना घडली.
या घटनेनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांत संतापाची लाट पसरली असून वातावरण तणावपूर्ण झालं आहे. सकाळच्या सुमारास घटनास्थळी सोलापूर शहर पोलीस दाखल झाले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे संबंधित माथेफिरूचा शोध सुरू केला आहे.
दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी, सोलापूर शहर जिल्ह्यात काँग्रेसचं कामकाज जोमाने सुरू असून हे विरोधकांना बघवत नसल्याचा आरोप करत विरोधकांनीच ही दगडफेक केल्याचा आरोप केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times