मुंबई : राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप हा संघर्ष सुरू असतानाच आता काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपची मंदिरे उघडण्याची मागणी आणि (Narayan Rane) आणि इतर केंद्रीय मंत्र्यांच्या सुरू असलेल्या जन आशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने (Congress) भाजपवर जोरदार टीका केली आहे.

‘केंद्र सरकारच्या इशाऱ्यानुसार महाराष्ट्रात करोनाच्या तिसऱ्या लाटेत ६० लाख रुग्णसंख्या होण्याची शक्यता आहे. नीती आयोगानेही तिसऱ्या लाटेचा इशारा दिला असतानाही सत्तेच्या हव्यासापोटी आंधळा झालेला महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष पुन्हा मंदिरांचे राजकारण करत आहे. नीती आयोग शंखासूर भाजपाला समज कधी देणार?’ असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

स्वार्थी राजकारणाकरिता जनतेचा जीव धोक्यात घालणाऱ्या भाजपाच्या सुपरस्प्रेडर नेत्यांनी ऐकले नाही व नियमांचे उल्लंघन केले तर पोलिसांनी कुठलीही दया न दाखवता मुसक्या आवळाव्यात, असंही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

राज्यातील मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी शंखनाद आंदोलन हाती घेतलेल्या भाजपचा समाचार घेत सावंत पुढे म्हणाले की, ‘कालच केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रात उत्सवावर निर्बंध घालावेत असे निर्देश दिले आहेत, तर आज केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनीही करोनाचा प्रभाव रोखण्यासाठी करोना नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनासंदर्भात केंद्र सरकारने घातलेले निर्बंधही ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आले आहेत. केंद्रातील मोदी सरकार राज्य सरकारांना करोना वाढणार नाही यासाठी कडक उपाययोजना करण्यासाठी उत्सवांवर निर्बंध घाला असे सांगत असताना त्यांच्याच पक्षाचे राज्यातील नेते मात्र गर्दी जमवणारे उत्सव, दहिहंडी, मंदिरे उघडा यासाठी महाराष्ट्रात आंदोलनाची भाषा करत आहेत. ‘जब तक दवाई नही, तब तक ढिलाई नही’, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनालाही राज्यातील भाजपा नेते हरताळ फासत आहेत,’ असा घणाघात सचिन सावंत यांनी केला आहे.

‘भाजपकडून लोकांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न’
‘करोनाचा धोका अद्याप टळलेला नसतानाही जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून गर्दी जमवली जात आहे. या यात्रेदरम्यान करोना नियमांच्या उल्लंघनाबाबत गुन्हे दाखल होऊनही भाजपचे डोके ठिकाणावर आलेले नाही. दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढण्यासाठी भाजपचे पश्चिम बंगालमधील सत्तेचे राजकारण कारणीभूत ठरले. आता तिसरी लाट लवकर आणण्यासाठी मंदिरे उघडणे व दहिहंडी आयोजनाचा हट्ट करत आहेत. लोकांच्या जीवाची पर्वा न करता राजकीय हेतूने गर्दी जमवून हजारो लोकांचे जीव धोक्यात घालण्याचे काम भाजप नेते करत आहेत,’ असा हल्लाबोल सचिन सावंत यांनी केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here