रत्नागिरी: करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणेबाबत आवाहन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हयात सध्या कोविड संसर्ग स्थिती नियंत्रणात असली तरी येणाऱ्या गणेशोत्सवा दरम्यान संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्हयामध्ये इतर जिल्हयातून येणाऱ्या लोकांनी लसीचे दोन डोस घेतले असतील त्यांना करोनाची चाचणी करण्याची आवश्यकता नाही. ज्या प्रवाशांनी लसीचे दोन डोस पूर्ण केले नसतील अशा व्यक्तीची जिल्हयात प्रवेश करताना करोना चाचणी करण्यात येईल. चाचणीमध्ये ज्या व्यक्ती करोना बाधित आढळतील त्यांना संस्थात्मक विलगीकरणात राहणे बंधनकारक असेल. रत्नागिरी जिल्हयामध्ये प्रवेश करण्यापूर्वी ७२ तास आधी RTPCR चाचणी केलेली असल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक असणार आहे. ()

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणोशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांनी तयारी सुरू केली आहे. मात्र, यंदाही गणेशोत्सवावर करोनाचे सावट असल्यानं प्रवाशांना करोनाचे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याप्रशासनानं मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताना या नियमांचे पालन करणारे बंधनकारक असणार आहे.

सण, कार्यक्रमांनंतर करोना संसर्गाचा उद्रेक होऊ नये म्हणून शासनाने त्रिसूत्री घालून दिली आहे. योग्यप्रकारे मास्क वापरणे गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे, सामाजिक अंतर ठेवणे आणि हात वारंवार धुवून स्वच्छता राखणे या बाबींचे काटेकोर पालन करण्यात यावे, असं प्रशासनानं आवाहन केलं आहे.

 • रत्नागिरी जिल्हयामध्ये येणाऱ्या आणि जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांसाठी सप्टेंबरपासून राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतुक करणार आहेत. तथापि प्रवास करताना एसटी, रेल्वेमध्ये प्रवाशांनी करोना संसर्ग नियमाचे पालन करणे आवश्यक आहे व त्याची जबाबदारी वाहक व चालक यांची असेल.
 • गणेशोत्सवासाठी जिल्हयात येणाऱ्या वाहनांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रमुख मार्गावर ठिकठिकाणी स्वागत केंद्र म्हणून मंडप उभारणेत येतील. जेणेकरुन वाहन चालकाला थोडीशी विश्रांती मिळू शकेल. त्याचबरोबर प्रवाशांना आरोग्य विषयक मदत सुविधाही सदर स्वागत केंद्रात उपलब्ध होऊ शकेल.
 • जिल्हयातील महामार्गावरुन गणेशभक्तांचा प्रवास व वाहतुक सुरळीतपणे सुरु रहाण्यासाठी वाहतुक नियंत्रक पोलीस यांनाही आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आलेल्या आहेत.

वाचाः

 • गणेशोत्सव कालावधीत अपघात टाळण्याच्या दृष्टीने रस्त्यांवरील अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून त्याबाबतचे दिवस निश्चित करण्यात येतील महामार्गावर आरोग्य यंत्रणेसह रुग्णवाहीका व इतर यंत्र सामग्री सज्ज ठेवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आलेल्या आहेत.
 • गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक गणपती बसवण्यात येऊ नयेत असे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. तथापि, सार्वजनिक गणपती बसविल्यास तो दीड दिवसाचा असावा, असे आवाहन करण्यात येत आहे व त्या ठिकाणी कमीत कमी लोकांची उपस्थिती ठेवणे व करोना संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित मंडळावर राहील.
 • श्रीगणेश आगमन व विसर्जन यावेळी मिरवणूक काढण्यात येऊ नये, गणेशोत्सव काळात आरती / भजन / किर्तन / जाखडी या सारख्या कार्यक्रमांना गर्दी करण्यांत येऊ नये. हे कार्यक्रम कौटुंबिक स्तरावरच करावे.
 • शासनाने नेमून दिलेल्या नियमांप्रमाणे गणेशमूर्ती असावी, गणेशोत्सवामध्ये सजावट, आरास करतांना शासनाने प्रतिबंधीत केलेले प्लॅस्टीक, थर्माकोल याचा वापर टाळून नैसर्गिक वस्तूंपासून आकर्षक आरास करावी .
 • उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा शक्यतो वापर करु नये व अशा मूर्तीचे विसर्जन घरगुती स्वरुपात करावे, श्रीगणेशाचा प्रसाद देणे टाळावे अथवा सुका मेवा / सुके पदार्थ पूर्ण फळ याचा प्रसाद दयावा, मिठाईमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी आवश्यक ते नियोजन करणेबाबत अन्न व औषध प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत.
 • गणेशोत्सव काळात ध्वनीप्रदूषण कटाक्षाने टाळावे, गणेशोत्सवामध्ये दर्शन, भजन, किर्तन, जाखडी इत्यादी कार्यक्रमांसाठी नातेवाईक / मित्रमंडळी यांचे घरी जाणे – येणे टाळावे, गणेशमूर्ती विसर्जन घराच्या आवारात करावे.
 • घरच्या घरी गणेश विसर्जन करणे शक्य नसेल तर कृत्रिमरित्या तयार करण्यांत आलेल्या तलाव, हौद यामध्ये गर्दी न करता करावे, स्थानिक प्रशासनाने गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौद, तलाव यांची निर्मिती करावी. तसेच निर्माल्य टाकण्यासाठी निर्माल्यकलशांची ठिकठिकाणी निर्मिती करावी.
 • इतर जलस्त्रोतांमध्ये मूर्ती किंवा निर्माल्य यांचे विसर्जन केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी, नगरपालिका, ग्रामपंचायत यांचे मार्फत गणेशमूर्ती संकलन वाहनाची व्यवस्था करण्यात यावी जेणे करुन गर्दी टाळणे शक्य होईल. गणेशोत्सव कालावधीत विदयुत पुरवठा अखंडीत राहील यासाठी विदयुत वितरण कंपनीने दक्ष रहाण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here