: आर्थिकदृष्ट्या सधन समजल्या जाणाऱ्या कृष्णा काठावर अंकलखोप (ता. पलूस) येथे वेगवेगळ्या दोन ठिकाणी शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. गणेश बाळासो सूर्यवंशी (वय ४०) आणि गणपती रावसो चौगुले (वय ४५, दोघेही रा. अंकलखोप, ता. पलूस) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. या घटनेची नोंद भिलवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

महापुरानंतर कृष्णाकाठावर तीन शेतकर्‍यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आणि त्यातून वाढता कर्जाचा बोजा यामुळे शेतकऱ्यांची मानसिक स्थिती ढासळत असल्याचं यातून दिसत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश सूर्यवंशी हे शेतीबरोबर गाडी भाडेतत्त्वावर चालवण्याचा व्यवसाय करत होते. मागील महिन्यात आलेल्या महापुरामुळे शेतीचं मोठे नुकसान झालं. लॉकडाऊनमुळे वाहन व्यवसायही ठप्प होता. त्यामुळे आर्थिक विवंचनेत असलेले सूर्यवंशी अस्वस्थ होते. गाडीचा व्यवसाय बंद झाल्यामुळे कर्जाचे हप्ते थकले होते. कर्जाला कंटाळून त्यांनी रविवार रात्री औदुंबर फाटा येथील रामफळाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी निदर्शनास आला.

दुसऱ्या घटनेत अंकलखोप गावातील गहिणीनाथनगर येथील गणपती चौगुले यांनी रविवारी रात्री घरात कोणी नसल्याचे पाहून घरातील पंख्याला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी गणपती चौगुले त्यांच्या मुलगा लक्षात आली. गणपतीच्या मुलीचे बाळंतपण झाल्यामुळे गणपतीची पत्नी मुलीच्या सासरी गेली होती. तर मुलगा भावाच्या घरी झोपण्यास गेला होता. सकाळी मुलगा घरी आल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला.

बँकांचे कर्ज थकल्यामुळे गणपती चौगुले हे गेल्या काही महिन्यांपासून अस्वस्थ होते. या घटनेची फिर्याद भाऊ महादेव चौगुले यांनी दिली आहे.

दरम्यान, सतत येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या महिन्यात येऊन गेलेल्या महापुरात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं. सरकारकडून अद्यापही मदत मिळाली नसल्याने शेतकरी नाराज आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here