मुंबई: करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आता इराण आणि इटलीवरून येणाऱ्या प्रवाशांचीही विमानतळावर तपासणी करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या नवीन सूचनेनुसार चीनसह हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, दक्षिण कोरिया, जपान, नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि मलेशिया या १० देशातील प्रवाशांसोबतच इराण आणि इटलीतील प्रवाशांची तपासणी केली जात आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री यांनी दिली.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत ४४१ विमानांमधील ५३ हजार ९८१ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महानगरपालिकांकडून आवश्यक मनुष्यबळ विमानतळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून ३०४ प्रवासी आले आहेत. त्यापैकी २२५ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.

राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ९१ जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी सर्व ९१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. त्यापैकी ८८ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या एक जण पुणे येथे तर दोघे मुंबईत भरती आहेत. राज्यात एकही संशयित रुग्ण आढळला नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here