मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी साजरी करण्यास राज्य सरकारनं मनाई केली होती. तरीही उत्सव साजरा करू पाहणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली. गुन्हे दाखल करण्यात आले. करोनाचे निर्बंध अनेक ठिकाणी शिथील होत असताना अद्याप मंदिरं उघडण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. गणेशोत्सवासाठी सुद्धा राज्य सरकारनं काही अटी घालून दिल्या आहेत. सण-उत्सवांवर घातल्या गेलेल्या या निर्बंधांवरून शेलार यांनी सरकारला, विशेषत: शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.
वाचा:
‘काल दिवसभर गोविंदांना नोटीस पाठवल्या गेल्या. धरपकड करण्यात आली. सचिन वाझेवर वसुलीचे आरोप झाले, तेव्हा सचिन वाझे हा लादेन आहे काय? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी केला होता. मग धरपकड करायला आणि गुन्हे दाखल करायला, गोविंदा म्हणजे काय लादेन आहेत काय?, असा सवाल शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना केला.
वाचा:
‘हिंदू सणांवर आक्रमण केलं जात आहे. एका विशिष्ट वर्गाची मत मिळायला लागल्यापासून गेल्या तीन-चार वर्षांपासून शिवसेनेनं हे काम सुरू केलं आहे. याची सुरुवात बेहराम पाड्यापासून झाली आहे. बेहरामपाड्यात शिवसेनेचा नगरसेवक निवडून आला आणि सर्व्हेतून काही निष्कर्ष समोर आल्यानंतर शिवसेनेनं एका विशिष्ट वर्गाचं लांगुलचालन सुरू केलं आहे. लालबाग, परळ आणि महाराष्ट्रातील जनतेकडं दुर्लक्ष केले आहे,’ असा आरोप त्यांनी केला. ‘आमचा सणांना विरोध नाही. सणउत्सवाच्या निमित्तानं होणाऱ्या गर्दीला विरोध आहे. त्यामुळं करोना वाढू शकतो, असं मुख्यमंत्री सांगतात. मग मुंबईसह राज्यातले रेस्टॉरंट, बार, पबमध्ये होणाऱ्या गर्दीचं काय?, असा सवाल शेलार यांनी केला. ‘नवीन नियमावली करून मंदिरं उघडा, प्रादूर्भाव वाढणार नाही याची काळजी घेऊन गणेशोत्सव साजरा करू द्या, अशी मागणी शेलार यांनी शेवटी केली.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times