कोल्हापूर जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून करोनाचा संसर्ग सुरू आहे. मे महिन्यापासून त्याचा कहरच होत गेला. जून, जुलै महिन्यात तर करोनाचा विळखा खूपच घट्ट झाला होता. रोज दीड ते दोन हजारापर्यंत करोनाबाधित रूग्ण आढळत होते. मृतांचा आकडा रोज ४० पर्यंत जात होता. त्यामुळे जिल्ह्यात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. करोनाला रोखण्यासाठी केंद्रिय पथक तसंच टास्क फोर्सने जिल्ह्याला भेट देऊन पाहणी केली.
पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हे तीन मंत्री प्रशासनावर लक्ष ठेवून करोना रोखण्यासाठी कार्यरत होते. मात्र, कहर कमी होत नसल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती.
या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसापासून करोनाचा विळखा काही प्रमाणात सैल झाला होता. बाधितांचा आकडाही हजारावरून रोज दोनशेपर्यंत पोहोचला. पण, मृतांचा आकडा शुन्यावर आला नव्हता. रोज पाच ते दहा जणांचा करोनामुळे बळी जात होता. मे महिन्यापासून तीन हजारावर लोकांचा यामुळे मृत्यू झाला. तर दीड वर्षात करोना बळींची संख्या साडे पाच हजारावर पोहोचली. बुधवारी मात्र करोनाने चांगलाच दिलासा दिला. करोनामुळे एकही बळी गेला नाही. दिवसभरात १०६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
एकीकडे १५ ऑक्टोबरपासून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असताना कोल्हापुरात मात्र अजूनही दुसरी लाट सुरूच आहे. मात्र, बळींची संख्या शुन्यावर आल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
करोनाची स्थिती
करोना चाचणी – १९, ११,५२३
करोनाचे बाधित रुग्ण – २,०४१०५
बरे झालेले रुग्ण – १,९६,९७७
सक्रिय रूग्ण – १४२८
करोनाचे बळी – ५७००
रूग्ण बरे होण्याचे प्रमाण – ९६.५० टक्के
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times