संबंधित पीडित महिलेने नरेंद्र मेहतांकडून शोषण होत असल्याची तक्रार २०१६ मध्ये आणि जुलै २०१९ मध्ये अशी दोनवेळा केली. त्यानंतरही पोलिसांनी मेहता यांच्यावर पोलिसांनी का कारवाई केली नाही?, असा सवाल विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केला. याप्रकरणी गृहमंत्रालयाने चौकशी करून माहिती घ्यावी, असे निर्देशही गोऱ्हे यानी दिले. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कारवाईचे आश्वासन दिले.
मी संबंधित महिलेशी मंगळवारी बोललो आहे. त्या महिलेने नरेंद्र मेहता यांच्याविरुद्ध नव्याने तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे. ही तक्रार येताच एफआयआर दाखल करण्यात येईल व कारवाई सुरू करण्यात येईल, असे देशमुख यांनी नमूद केले. पोलिसांनी नरेंद्र मेहता यांचा जबाब नोंदवून घेतला आहे मात्र त्यापुढे कोणतीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नरेंद्र मेहता यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर सोमवारी मेहता यांनी भाजप सोडण्याचा तसेच राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय अचानकपणे जाहीर केला होता.
भाजपने मेहतांवर काय कारवाई केली?
पीडित महिलेशी संपर्क साधला आहे. तसंच काल रात्री ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांच्याशी बोलले आहे. रितसर तक्रार आली नाही, असं त्यांनी मला सांगितल्याचं गोऱ्हे म्हणाल्या. पीडित महिलेशी बोलले असता, २ जुलै २०१९ रोजी आपण यासंदर्भात तक्रार केली होती. २०१६मध्येही नोटरी करून मेहता आपल्याला कशा पद्धतीनं त्रास देत आहेत हे निदर्शनास आणून दिल्याचं संबंधित महिलेनं आपल्याला सांगितल्याचं गोऱ्हे म्हणाल्या. २०१९ रोजी केलेल्या तक्रारीवर काहीच कारवाई झाली नाही. उलट त्यानंतर मेहता यांनी आपण कसे योग्य आहोत यावर विधिमंडळात भाषण दिल्याचं समजलं. मी या संदर्भात गृहमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. काही महिला आमदारांचेही फोन आले होते. त्यांना दोन्ही सभागृहांमध्ये या विषयावर बोलायचं आहे. मेहता यांची चौकशी झाली पाहिजे. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी गोऱ्हे यांनी केली. महिला अत्याचारावरून सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या भाजपवरही त्यांनी टीका केली. महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरून राज्य सरकारविरोधात जो पक्ष आंदोलन करत आहे, त्या भाजपनं अद्याप मौन का बाळगलं आहे? भाजप प्रदेशाध्यक्षांनी मेहता यांच्यावर काय कारवाई केली हे स्पष्ट केलं पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times