पालिकेने दिलेल्या मासिक अहवालामध्ये लेप्टोमुळे मुंबईत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असला, तरीही डेंग्यूमुळे एकाही मृत्यूची नोंद करण्यात आली नाही. मात्र, पालिकेच्या नायर रुग्णालयात या महिन्यात लेप्टो रॅपिड अँटिजेन चाचणीमध्ये तीन, तर डेंग्यू रॅपिड चाचणीमध्ये दोन जणांचा मृत्यू डेंग्यूमुळे झाल्याचे उपलब्ध अहवालावरून स्पष्ट होते. पालिकेच्या अंतिम अहवालामध्ये ही नोंद करण्यात आलेली नाही.
पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांच्याकडे यासंदर्भात विचारणा केली असता, मृत्यू विश्लेषण समितीकडून या मृत्यूच्या कारणांचे विश्लेषण केले जाते. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार, या मृत्यूंची नोंद अंतिम अहवालामध्ये करण्यात येते. या समितीचा अहवाल येत नाही, तोपर्यंत ही नोंद समाविष्ट होत नाही. तसेच अशा संशय़ित रुग्णांची माहिती आरोग्य विभागाकडे ठेवण्यात येते, असे त्यांनी ‘मटा’ला सांगितले.
एलायझा तसेच रॅपिड अँटिजेनने केलेल्या चाचण्यांचे निदान हे अंतिम मानले जाण्यासंदर्भातही वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पालिकेच्या सर्व उपनगरीय रुग्णालयांमध्ये या चाचण्यांची सुविधा उपलब्ध नाही. या चाचण्यांचे अहवाल येईपर्यंत तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे चाचणी केल्यापासून निदान अहवाल येईपर्यंत मृत्यू झाल्यास त्याची नोंद होत नाही. काही रुग्णालयामध्ये रॅपिड निदान चाचणी केली जाते. या चाचण्या मोजक्या प्रयोगशाळांमध्ये केल्या जातात. चाचणीदरम्यान झालेल्या मृत्यूची नोंद कुठे व कशी होणार हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे या अहवालासंदर्भातील धोरणामध्ये बदल करण्याची गरज व्यक्त होत आहे. काही आरोग्यकेंद्रामध्ये तसेच दवाखान्यांमध्ये तंत्रज्ञ नसतात, तर कधी तपासण्यांच्या किटचा तुटवडा असतो. त्यामुळे योग्यवेळी तपासणी होत नाही. पालिकेच्या एखाद्या रुग्णालयामध्ये या चाचण्या उपलब्ध नसतील, तर त्या किट उपलब्ध असलेल्या ठिकाणी पाठवण्यात येतात. तिथे हे नमुने स्वीकारले जात नसल्याची तक्रार रुग्णालयातील तंत्रज्ञ सातत्याने करतात.
स्वाइन डोके वर काढतोय
करोना संसर्गाची धास्ती असताना, स्वाइन फ्लूचा आजारही डोके वर काढताना दिसत आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत ४५ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून, या महिन्यात ही संख्या १७ आहे. जुलैमध्ये स्वाइन फ्लूच्या २१ रुग्णांची नोंद झाली होती. तर ऑगस्ट २०१९मध्ये स्वाइनचे ३६ रुग्ण आढळून आले होते.
येथे प्रादुर्भाव अधिक
डेंग्यूची सर्वाधिक रुग्णसंख्या ही एफ दक्षिण, बी आणि एच पश्चिम प्रभागामध्ये नोंदवण्यात आली आहे. आतापर्यंत १३,१५,३७३ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून ११,४९२ डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जानेवारी ते ऑगस्ट रुग्ण
मलेरिया – ३,३३८
लेप्टो – १३३
डेंग्यू – २०९
गॅस्ट्रो – १,८४८
कावीळ – १६५
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times