शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’मध्ये लिहिलेल्या अग्रलेखातून शिवसेनेनं विरोधकांचा समाचार घेतला आहे. मंदिरं उघडण्यासाठी व दहीहंडीसाठी आंदोलनं म्हणजे मूर्खपणाची बोंबाबोंब आहे, असं शिवसेनेनं म्हटलंय. ‘तिसरी लाट जास्त धोकादायक आहे. दहीहंडी व गणेशोत्सवात सावधानता बाळगा, असं केंद्र सरकारनंच ठाकरे सरकारला ‘लेखी’ कळवलंय. आता तुम्ही दिल्लीतल्या तुमच्या माय-बापांचंही ऐकणार नाहीत का? महाराष्ट्रात ‘घंटा’ बडवताय कशाला? गर्दीवर, सणांवर निर्बंध आणा अशा केंद्राच्याच सूचना आहेत. मग दिल्लीत जाऊन घंटानाद करण्याची हिंमत दाखवत का नाही?,’ असं शिवसेनेनं भाजपला सुनावलं आहे. मंदिर आंदोलनात भाजपला पाठिंबा जाहीर करणाऱ्या अण्णा हजारे यांनाही शिवसेनेनं टोला हाणला आहे. ‘बेमुदत उपोषणाचा इशारा अण्णांनी दिल्यामुळं बहुधा आपले देवही गोंधळले असतील,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
वाचा:
‘ठाकरे सरकार हे हिंदूविरोधी असल्याचा प्रचार केला जातोय. सण, उत्सवांच्या बाबत ठाकरे सरकार कोरडं आहे. देवदेवळांचं सरकारला काहीच पडलेलं नाही, अशा प्रचारी पिचकाऱ्या मारल्या जात आहेत. पण त्या पिचकाऱ्या विरोधकांवरच उलटणार आहेत. विरोधकांचं डोकं ठिकाणावर असेल तर त्यांनी आपल्या राज्यातील जनतेचा विचार आधी केला पाहिजे. माणूस जगला नाही, तर मंदिरं कायमचीच ओस पडतील असं भयानक चित्र करोनामुळे जगभरात निर्माण झालं आहे, याकडं शिवसेनेनं लक्ष वेधलं आहे.
‘लढाई करोनाच्या विरोधात हवी, पण विरोधकांना मूर्खपणाचं फुरसं चावल्यामुळं त्यांची लढाई सरकारविरोधात आहे. अर्थात विरोधकांना फुरसं चावलं म्हणून सरकारनं स्वतःचा तोल ढळू देता कामा नये. कारण राज्यातील कोट्यवधी लोकांच्या जिवाचा विचार करून सरकारला पावले उचलायची आहेत,’ असा सल्लाही शिवसेनेनं सरकारला दिला आहे.
नाव न घेता मनसेवर शेलक्या शब्दांत टीका
‘निर्बंध झुगारून दहीहंडी साजरी करण्याचं शौर्य महाराष्ट्रातल्या काही फुटकळ विरोधी पक्षांनी बजावलं आहे. हे पक्ष आज पूर्णपणे अस्तित्वहीन आणि निपचित झाले आहेत. लोकांनी त्यांना निवडणुकांत वारंवार जमीनदोस्त केले, पण विरोधासाठी विरोध या एकमेव अजेंड्यावर विरोधी पक्ष दोन-चार लोकांना एकत्र करून रस्त्यांवर हंड्या फोडत स्वतःचंच हसं करून घेत होता,’ अशी बोचरी टीका शिवसेनेनं केली आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times