पुणे: इंदोरीकर महाराजांच्या एका वक्तव्यावरून निर्माण झालेला वाद हळूहळू निवळताना दिसत आहे. या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर इंदोरीकर महाराजही वाद मागे सोडून कीर्तनाच्या वाटेने पुन्हा मार्गस्थ झाले आहेत. पुण्यातील कोथरूडमध्ये पोलीस बंदोबस्तात, मोठ्या गर्दीत इंदोरीकर महाराजांचे कीर्तन पार पडले. महाराजांनी कीर्तनाच्या ओघात एकप्रकारे आपली बाजू सगळ्यांपुढे ठेवण्याचा प्रयत्न केला.

‘खरं बोललो की किती त्रास होते हे आम्हालाच माहिती’, असे वक्तव्य करत इंदोरीकर महाराजांनी गेले काही दिवस सुरू असलेला वाद कसा निरर्थक आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. मी एकवेळ मरेन पण तुम्हाला रोज माझ्या वाक्यांची आठवण येईल, असेही ते पुढे म्हणाले. कोथरूडमधील तुळजाभवनी माता व राधाकृष्ण सेवा संस्थेच्या राधाकृष्ण मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात महाराज बोलत होते.

टिकटॉकवर डागली तोफ!
भाकरीऐवजी सफरचंद खातो आणि लग्न करण्याऐवजी टिकटॉक बघतो तो संत नसून भामटा आहे, अशा शब्दांत इंदोरीकरांनी भोंदूगिरी करणाऱ्यांवर तोफ डागली. आज मुले टिकटॉक, पब्जीच्या आहारी गेलीत तर पालक मोबाइलच्या आहारी गेलेत, त्यामुळे सुसंस्कार नसलेला समाज घडताना दिसत आहे. यावर मात करायची असेल तर साऱ्या विद्यांचा पाया असलेल्या ज्ञानाची आराधना करावी लागेल, असे इंदोरीकर म्हणाले. आईवडील हेच आज देव असून त्यांचे संस्कार गाठीशी असल्यानेच आपल्याला चांगले दिवस आले, हे मुलांनी विसरता कामा नये. ज्याच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर समाधान असते आणि ज्याची धर्मावर निष्ठा असते ती व्यक्ती कायम सुखी असते, असेही म्हणाले. जगात देव आहेच मात्र तो संतांशिवाय समजत नाही, असे नमूद करताना आज संतांची पोकळी असल्याची खंत इंदोरीकरांनी व्यक्त केली.

नेमका काय आहे वाद?

सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वक्तव्य इंदोरीकर महाराजांनी एका कीर्तनात केलं होतं. त्या वक्तव्यामुळं महिलांचा अपमान झाला असून त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा, या मागणीसाठी तृप्ती देसाई यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. अहमदनगर येथे त्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल न झाल्यास त्यांना काळं फासू असा इशारा दिला होता. त्यामुळं तृप्ती देसाईच वादात अडकल्या आहेत. इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अनेक संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. तसंच, टिकटॉक या प्रसिद्ध अ‍ॅपवरही तरुणाईनं इंदोरीकर महाराजांना पाठिंबा दिला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here