नवी दिल्लीः केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान ( ) यांनी तालिबानची गौरव गाणी गाणाऱ्या काही भारतीय मुस्लिमांवर घणाघाती हल्ला चढवला आहे. ‘डोक्यात मेंदू नसलेले हे लोक आहेत. सनातनीही म्हणण्याच्याही ते लायकीचे नाहीत. पण भारतीय मुस्लिमांच्या एका वर्गाकडून तालिबानला होत असलेले समर्थन बघून लाज वाटतेय’, असं आरिफ मोहम्मद खान म्हणाले.

इतिहास वाचा, यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. महिला जीवनाच्या प्रत्येक पावलावर भागीदार होत्या. तालिबानला समर्थन करणाऱ्यांची वायफळ वक्तव्य बघून लाज वाटते आणि खेदही वाटतो. पण यात काही नवीन नाही, असं राज्यपाल मोहम्मद म्हणाले.

असेच लोक अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या स्थापनेनंतर सर सय्यद अहमद यांचा विरोध करत होते. ‘सय्यद यांनी त्यावेळी दारुल उलूम देवबंदच्या प्रमुखांसह अनेक मौलवींना पत्र लिहिली होती. त्यांच्या विचारांना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात स्थान दिले जाणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली होती. तुम्ही पुढे यावं आणि एक समिती बनवावी. मग अभ्यासक्रम काय असेल हे ठरवावं. तुम्ही ठरवून दिलेला अभ्याक्रम आम्ही शिकवू, असं आवाहन त्यांनी पत्रातून केलं होतं. पण त्यावेळी देवबंद प्रमुख आणि इतरांचं उत्तर हे अतिशय लाजीरवाणं होतं. अलिगढमध्ये शिया विद्यार्थ्यांनाही प्रवेश दिला जाणार आहे, हे आम्हाला माहिती आहे. शिया विद्यार्थ्यांना प्रवेश देणाऱ्या कुठल्याही संस्थेशी आमचा संबंध नाही, असं उत्तर देवबंद प्रमुखांनी दिलं होतं’, असं राज्यपाल मोहम्मद यांनी सांगितलं.

सर सय्यद हे त्यावेळी योग्य बोलले होते. ‘शिक्षणापासून वंचित असलेल्या लोकांच्या शैक्षणिक सुधारणेसाठी मला काम करायचं आहे. पण माझी अडचण होते. हे करा, असं मी म्हटल्यावर ते वाद घालतात. हे धर्माच्या विरोधात आहे, असं म्हणतात. पण ज्ञान कधीही धर्माच्या विरोधात नसतं’, असं त्यावेळी सर सय्यद बोलल्याचं खान यांनी सांगितलं.

‘ह्या लोकांना मेंदूच नाही’

हे मेंदू नसलेले लोक आहेत. सनातनी विचारसरणीतही हे लोक बसत नाही. त्यांना प्रत्येकाला बाहेर ठेवायचं आहे. ते महिलांना स्वीकारू शकत नाहीत. लोक त्यांची खिल्ली उडवतात. संपूर्ण जग त्यांना घाबरतं, असं खान म्हणाले.

नसिरुद्दी शाह बरोबर बोलले. आपण आपल्या मुळापासून दूर होऊ शकत नाही. ५० वर्षे मागे जाऊन बघा. पँट-शर्ट घातलेल्या व्यक्तीला मशिदीत प्रवेशास बंदी होती. घड्याळ घालून येणाऱ्यालाही मशिदीत येऊ दिलं जात नव्हतं. इंग्रजी शिकत असाल तर तुम्ही मुस्लिम नाही, असं बोललं जात होतं. पण ३० वर्षांनी त्यांना आपली मतं बदलावी लागली, असं राज्यपाल आरिफ मोहम्मद खान म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here