दापोलीः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या आज दापोलीत होत असलेल्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत काही महत्वाच्या विषयांवर वादळी चर्चा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. कोकण कृषी विद्यापीठावर अन्याय करणारी पत्रे कृषी मंत्र्यांकडूनच प्राप्त झाल्याने या विषयात कोकणातील आमदार कोणती ठाम भूमिका घेतात याकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिले आहे.

कोकण कृषी विद्यापीठाने कृषि विभाग प्रमुख व अन्य दोन प्रोफेसर अशी एकूण तीन पदे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात वर्ग करावी व अजून एक ते दोन प्राध्यापक समकक्ष पदे वर्ग करावीत असा फतवा थेट कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडुन निघाल्याची माहिती माजी आमदार भाई मोकल व प्रसाद बाळ यांनी दिली असून या प्रकरणावरून आश्चर्य व्यक्त होत आहे. आधीच मनुष्यबळ कमी आहे असे कारण कोकण कृषी विद्यापीठाकडून देत दोन महत्वाचे पीएचडीचे अभ्यासक्रम बंद करण्यात आले आणि आता कृषी विद्या विभाग प्रमुख पदच वर्ग करावे यासाठी कृषी मंत्र्यांचे वजन वापरण्यात आल्याचा आरोप बाळ यांनी केला आहे. या सगळ्या विषयी दापोली तालुक्यातील लाडघर येथे प्रसाद बाळ यांनी आवाज उठवला आहे.

कोकणातील सगळे आमदारांची भेट घेऊन कोकण कृषी विद्यापीठाला दुबळे करण्याचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा बाळ यांनी दिला आहे. दापोलीचे माजी आमदार कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे माजी सदस्य डॉ.चंद्रकांत उर्फ भाई मोकल यांनी या विषयात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून हा डाव कोकणवासीय यशस्वी होऊ देणार नाहीत. कृषी विद्यापीठ याला गप्प राहून मूक संमती देणार असेल तर लवकरच याविरोधात लढा उभारुन कोकणातील माणसाची एकजूट व ताकद आम्ही दाखवून देऊ व ही पत्रे रद्द करण्यासाठी शासनाला भाग पाडू असे म्हटले आहे.

राज्यात सगळ्यात लहान असलेल्या कोकण कृषि विद्यापीठाला दुबळे करण्याचा हा डाव आहे. आज दोन कोर्स बंद झालेत भविष्यात अजून कोर्स बंद करून खर्चाचे कारण देत उर्वरित महाराष्ट्र मधील कृषि विद्यापीठात समाविष्ट करण्याचा हा डाव असल्याची शंका येते हा डाव हाणून पाडला नाही. तर भविष्यात कोकणातील विद्यार्थी, शेतकरी, बगायतदार आपल्याला कधीही माफ करणार नाहीत. त्यामुळे या सगळ्या विषयात गांभीर्याने लक्ष घालून शासनाकडून कोकण कृषी विद्यापीठातील प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक व अन्य पदे भरतीला मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न कराल ही अपेक्षाही प्रसाद बाळ यांनी व्यक्त केली आहे.

या सगळ्यामुळे भारतीय कृषी अनुसंधान परिषदेकडून दर दोन वर्षांनी होणाऱ्या गुणवत्ता चाचणीत आपल्या कृषी विद्यापीठाचा गुणवत्ता क्रमांक अजून खाली जाईल अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे मिळणारा, निधी,संशोधन प्रकल्प या सगळ्यात कृषी विद्यापीठ गुणवत्ता दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल, अशी भीती या क्षेत्रातील जाणकार मंडळींकडून व्यक्त होत आहे.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here