ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ग्रामीण भागात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याकडं पत्रकारांनी अजित पवारांचं लक्ष वेधलं. अजित पवारांनीही ते मान्य केलं. ‘करोना रुग्णसंख्या वाढीच्या बाबतीत केरळनंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे, हे केंद्र सरकारनंही सांगितलंय. त्यांनीही काळजी घ्यायला सांगितलं आहे. दुर्दैवानं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात लोकांना भीतीच राहिलेली नाही. मास्क घातले जात नाहीत. शारीरिक अंतर पाळलं जात नाही. सुरक्षेच्या दृष्टीनं जे काही नियम पाळायला हवेत, ते पाळले जात नाहीत. करोना गेलाय अशा प्रकारचा एक गोड गैरसमज काही लोकांनी करून घेतलाय. त्यामुळं ही संख्या वाढलीय,’ असं अजित पवार म्हणाले.
हेही वाचा:
निर्बंध झुगारून सण-उत्सव साजरे करण्याचा हट्ट धरणाऱ्या राजकीय पक्षांवरही त्यांनी टीका केली. ‘राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वारंवार लोकांना काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत. मात्र, काही लोक त्यात राजकारण करतात. काही जण सण साजरे करण्याचा प्रयत्न करतात. येणाऱ्या निवडणुकांमध्ये स्वत:चं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करणार आहे. त्यासाठी भावनिक मुद्दे उचलून काही साध्या होतं का हे आजमावण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. तिसरी लाट आल्यानंतर पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या…’ म्हणत सगळंच बंद करण्याची वेळ सरकारवर आणू नका,’ असा इशारा त्यांनी दिला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times