महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर विनोद तावडे यांनी तीव्र आक्षेप घेतला. हा अभ्यासक्रम डॉ. अनिल काकोडकर, डॉ. विजय भटकर, सोनम वांगचुक यासारख्या प्रयोगशील शिक्षणतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासक्रम तयार झाला आहे. असे असताना यावर शिक्षणमंत्र्यांचा काय आक्षेप आहे, हे अनाकलनीय आहे, असे नमूद करताना वर्षा गायकवाड यांना स्वत:ची बुद्धिमत्ता डॉ. अनिल काकोडकर, डॉ. विजय भटकर यांच्यापेक्षा अधिक आहे असे वाटते का?, असा खरमरीत प्रश्नच तावडे यांनी उपस्थित केला आहे.
एसएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमात कोणताही बदल करायचा झाल्यास तो नॅशनल कॉन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अॅ्न्ड ट्रेनिंगच्या (NCERT) मार्गदर्शक सूत्रानुसारच करावा लागतो. पण सीबीएसई, आयसीएसई, आयजीसीएसई, आयबी या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण व्यवस्थेला स्वायत्तपणे अभ्यासक्रम बनविता येतो. या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थी सर्वार्थाने परिपक्व घडू शकतो. ग्रामीण भागातील मराठी विद्यार्थी हा या अभ्यासक्रमातून शिकला तर डॉक्टर, इंजीनिअर, शास्त्रज्ञ, आर्किटेक्चर, सनदी अधिकारी होण्याच्या शक्यता वाढल्या असत्या. पण दुर्देवाने महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मराठी विद्यार्थी हा अशा कुठल्याही गोष्टीपर्यंत पोहचू नये आणि पोहचायचेच असेल तर इंग्रजी माध्यमातूनच पोहचले पाहिजे, असा अट्टाहास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि श्रीमती वर्षा गायकवाड यांचा कां आहे हे न समजण्यासारखे आहे, अशी टीकाही तावडे यांनी केली.
एमआयईबी अभ्यासक्रमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मराठीतून शिकण्याची संधी मिळाली होती. मात्र, सरकारने हा अभ्यासक्रमच बंद करून शिक्षणाबद्दल त्यांचे विचार किती प्रतिगामी आहेत, हेच दाखवून दिले आहे, असा आरोपही तावडे यांनी केला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times