गडचिरोली : काल सायंकाळी मासेमारीसाठी बेडूक पकडायला गेलेल्या इसमावर बिबट्याने हल्ला करत चक्क शरीरापासून धड अलग केल्याची धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात समाविष्ठ येल्ला गावात घडली. ही घटना आज पहाटे उघडकीस आल्यावर या परिसरात एकच दहशत निर्माण झाली आहे. मुत्ता रामा टेकुलवार वय अंदाजे (५०) वर्षे असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.

अहेरी वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत समाविष्ट लगाम उपक्षेत्रातील येल्ला गावातील खंड क्रमांक ५८७ मध्ये ही धक्कादायक घटना घडली. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी मुत्ता टेकुलवार हा इसम गावालगत असलेल्या शेत शिवारातील विहिरीजवळ जाऊन बेडूक पकडून मासेमारी करण्यासाठी गेला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत सदर इसम घरी न परतल्याने घरच्यांनी आज सकाळी त्या परिसरात जाऊन पाहणी केली असता चक्क त्यांचा मृतदेह आढळून आला.

सदर घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी आरती मरावी आणि त्यांच्या चमूने घटनास्थळ गाठून पाहणी केली. या वेळी गावकर्‍यांनी एकच गर्दी केली होती. या अगोदर सुद्धा या परिसरात इतर नागरिकांनी बिबट्याला बघितल्याचे सांगितले आहे. नुकतेच मुलचेरा तालुक्यातील भवानीपुर ते श्रीनगर रस्त्यावरील शेतशिवारात बिबट्याचे पाऊल खुणा आढळून आले होते. त्यानंतर आज पहाटे ही धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे मुलचेरा तालुक्यातील लगाम परिसरात आता एकच दहशत निर्माण झाली आहे.

गडचिरोली तालुक्यात मागील एक वर्षात झालेल्या घटनांमुळे तब्बल 12 नागरिकांना वाघाच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला. वाघांच्या बंदोबस्त करण्यासाठी तब्बल 18 गावांतील नागरिकांनी मुख्य वनसंरक्षक कार्यालय समोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला तीन दिवस पूर्ण झाले असून वनविभाग आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच मुलचेरा तालुक्यात ही दुर्घटना घडली हे विशेष.

एकंदरीत गडचिरोली जिल्ह्यात वाघ आणि बिबट्याचे हल्ले वाढत असून यामध्ये नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे वनविभागाने या हिंस्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या घटनेत नेमका वाघ आहे की बिबट याबाबत अधिकृत माहिती मिळाले नसले तरी गावकऱ्यांकडून बिबट असल्याचे सांगण्यात येत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here