राज्यात महाविकास आघाडी स्थापन करताना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे प्रमुख पक्ष एकत्र आले. पण त्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसला पन्नास पेक्षा अधिक पक्षांनी पाठिंबा दिला होता. दोन्ही काँग्रेसच्या आघाडीत काही पक्ष सहभागी झाले होते. यातील काही प्रमुख पक्षांना महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्यात आले. राज्यात सत्ता आल्याने सत्तेत वाटा मिळेल या प्रतिक्षेत हे मित्र होते. पण दीड वर्षानंतरही त्यांच्याकडे कुणीच लक्ष देत नसल्याने त्यांच्याच नाराजी आहे. केवळ कागदावरच सत्तेत सहभाग मिळाला असून प्रत्यक्ष सत्तेचे कोणतेच लाभ आणि पद मिळत नसल्याने ही नाराजी वाढत आहे.
वाचा:
विविध घटक पक्षाचे आठ आमदार महाविकास आघाडीत आहेत. समाजवादी, स्वाभिमानी संघटना, शेकाप, बहुजन विकास आघाडी असे प्रमुख पक्ष या आघाडीत आहेत. यातील कुणाला तरी मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती. पण तसे काही झाले नाही. विधानपरिषद आणि राज्यसभा सदस्यांच्या बिनविरोध निवडी करतानाही या घटकपक्षांना विचारात घेतले नाही. मुळात राज्यात आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून एकदाही या घटकपक्षांच्या नेत्यांबरोबर सत्ताधारी नेत्यांनी बैठक घेतली नाही. कोणत्याच विषयावर त्यांच्याशी चर्चा नाही. त्यांना गृहित धरूनच कारभार सुरू असल्याने हे पक्ष नाराज आहेत. राज्यपाल नियुक्त आमदार निवडीत यांच्या नावाला कात्री लावल्याच्या वृत्ताने तर स्वाभिमानीसह इतर सर्वच पक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे.
वाचा:
पंधरा दिवसापूर्वी घटक पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीत नेत्यांनी आपली नाराजी उघड केली. भाजप शिवसेना सत्तेवर असताना तेदेखील स्वाभिमानी, रासप, शिवसंग्राम या पक्षांना अशीच वागणूक देत होते. आता महाविकास आघाडीतही तोच अनुभव येत असल्याने नाराजी वाढली आहे. सध्या राज्यात महामंडळ नियुक्तीचे वारे वाहत आहेत. या महामंडळावर घटक पक्षांना संधी मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे. महामंडळ वाटपाच्या बैठकीतही त्यांना निमंत्रण नव्हते. त्यामुळे महामंडळ देणार की नाही याबाबत शंका वाटत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हे घटकपक्ष आक्रमक झाले, त्यांनी स्वाभिमानी संघटनेच्या आंदोलनाला ताकद दिली तर महाविकास आघाडीसमोरील अडचणी वाढणार आहेत.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष
स्वाभिमानी शेतकरी संघटना
समाजवादी पक्ष
जनता दल धर्मनिरपेक्ष
बहुजन विकास आघाडी
रिपाई ( प्रा. जोगेंद्र कवाडे गट )
लोकभारती पक्ष
रिपाई (सचिन खरात गट)
शेकाप, माकप, भाकप व अनेक पक्ष
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times