पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरज तालुक्यातील म्हैशाळ येथील अशोक कोरवी यांनी ऑगस्ट २०१८ मध्ये बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या शैलेश धुमाळ व त्याचा मुलगा आशिष यांच्याकडून ३० लाख रुपये घेतले होते. याचा व्यवहार चेकद्वारे झाला होता. ३० लाखांपोटी महिन्याला २ लाख रुपये अव्वाच्या सव्वा व्याजदराने १८ महिने व्याज धुमाळ यांनी स्वीकारले. याशिवाय चेकद्वारे २५ लाख घेतल्यानंतर एकूण ६१ लाख रुपये कोरवी यांनी धुमाळ यांना दिले.
यानंतरही ५० लाख येणे बाकी असल्याचे सांगत धुमाळ पितापुत्रांकडून दमदाटी केली जात होती. कोरवी यांचा म्हैसाळ येथील १३ गुंठ्याचा प्लॉट नावावर करण्यासाठी तगादा लावला होता. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून कोरवी यांनी याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे तक्रार केली. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते.
तक्रार दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक नीरज उबाळे तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस उप निरीक्षक आर. एफ. मिरजे यांची दोन पथके नियुक्त केली. या दोन अधिकाऱ्यांच्या पथकांनी सावकार शैलेश धुमाळ याच्या सांगलीतील घरावर तसेच त्याचा मुलगा आशिष धुमाळ याच्या म्हैशाळ येथील घरावर पहाटे छापा टाकून दोघांना अटक केली.
या प्रकरणामध्ये शैलेश धुमाळ याच्या घरावर छापा टाकल्यानंतर त्याच्या आलिशान गाडीमध्ये रोख २ लाख ३६ हजार रुपये, काही कोरे चेक तसेच आलिशान कार जप्त केली. याशिवाय म्हैशाळ येथे आशिष धुमाळ याच्या घरी बँकांचे कोरे चेक सापडले आहेत. आशिष याचे म्हैशाळ येथील हॉटेल मनिषा एक्सिक्युटीव्ह याची देखील झडती घेण्यात आली. धुमाळ पितापुत्रांनी बेकायदेशीर सावकारीच्या माध्यमातून सीमाभागातील अनेक लोकांची लुबाडणूक केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. संबंधितांनी पोलिसात तक्रारी द्याव्यात, असं आवाहन पोलीस अधीक्षक गेडाम यांनी केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times