: मुलांच्या तस्‍करी प्रकरणात पोलिसांनी बुलढाण्यातील देऊळगाव राजा येथील एका ३८ वर्षीय महिलेला शनिवारी (४ सप्‍टेंबर) दुपारी अटक केली. नंदा देवीदास उदावंत असं या आरोपी महिलेचं नाव आहे.

या प्रकरणात संजयनगर मुकुंदवाडीत राहणारे समाजसेवक देवराज नाथाजी वीर (४७) यांनी दिलेल्या फिर्यादवरुन मुकुंदवाडी पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. पोलिसांनी २ सप्‍टेंबर रोजी जनाबाई जाधव आणि सविता पगारे यांना अटक केली होती. त्यानंतर पोलीस कोठडी दरम्यान त्‍यांनी माहिती दिली की, आमच्‍या खोलीत भाड्याने राहणाऱ्या बाईकडे येणाऱ्या लाखोले नावाच्‍या व्‍यक्तीने सांगितलं की, नंदा उदावंत ही महिला मुलांची विक्री करते. त्‍यानुसार जनाबाई आणि सविताने नंदाबाई उदावंत हिच्‍याकडून आठ ते दहा महिन्‍यांपूर्वी जालना येथील मुलाला ५५ हजारांत विकत घेतलं. माहिती मिळताच पोलिसांनी नंदा उदावंत हिला शनिवारी (४ सप्टेंबर) अटक केली.

अशी केली लहान मुलाची विक्री
पोलिसांनी नंदाची चौकशी केली असता, तिने सांगितलं की, आठ ते दहा महिन्‍यापूर्वी खामगाव येथे राहणाऱ्या आरोपीची मामी छाया डहाळे हिच्‍या माध्‍यमातून सुरेश लाखोले याची ओळख झाली. त्याने सांगितले की, औरंगाबादेत एका महिलेची मोठी कंपनी आहे, तिला कोणी वारस नाही, तिला एका लहान मुलाची आवश्‍यकता आहे. त्‍यामुळे नंदाने नातेवाईकाशी संपर्क साधत तिला वरील घटना सांगितली.

नंदाचे नातेवाईकही त्‍यासाठी तयार झाले. त्‍यानंतर नंदा, सुरेश लाखोले आणि नंदाचे नातेवाईक जालना येथील तहसील कार्यालयात आले. तेथे पूर्वीपासूनच जनाबाई जाधव आणि सविता पगारे या दोघी उपस्थित होत्‍या. नंदा व तिच्‍या नातेवाईकांनी जनाबाईकडे चौकशी केली असता, ती म्हणाली की, करोना काळात माझा मुलगा मरण पावला आहे. त्‍यामुळे आम्हाला वारसाची गरज आहे. यावर विश्‍वास ठेवून नंदा व तिच्‍या नातेवाईकाने ५५ हजारांत मुलगा विक्री केला. यात नंदाने कमिशन म्हणून पाच हजार रुपये घेतले तर उर्वरित पैसे पीडित मुलाच्‍या आईला दिल्याचे सांगितले. मात्र गुन्‍ह्यातील विक्री केलेल्या आणखी एका मुलाच्‍या आई वडिलांबाबत पोलिसांनी चौकशी केली असता नंदा उदावंत हिने काही एक माहिती दिली नाही.

तिघींना ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
नंदा उदावंत हिच्यासह यापूर्वी अटक करण्‍यात आलेल्या आरोपी महिला जनाबाई जाधव आणि तिची मुलगी सविता पगारे अशा तिघींना ७ सप्‍टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.एस. मांजरेकर यांनी दिले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here