काबूल: अफगाणिस्तानचा ताबा मिळवला तरी तालिबानसमोर नव्याने संकटे उभी राहिली आहेत. एकीकडे अंतर्गत मतभेदांमुळे सरकार स्थापनेला उशीर होत असल्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे पंजशीर खोऱ्यात तालिबानी सैन्याला धक्का बसत आहे. पंजशीर बंडखोरांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ६०० तालिबानी ठार झाले आहेत. तर, एक हजारांहून अधिक तालिबानींना अटक करण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला असल्याचे वृत्त रशियन वृत्तसंस्था ‘स्पुटनिक न्यूज’ने दिले आहे.

पंजशीर प्रांतावर तालिबानला ताबा मिळवता आला नाही. याआधीदेखील १९९६ ते २००१ दरम्यानच्या तालिबानी राजवटीतही स्वतंत्र होता. त्यामुळे यावेळेस पंजशीरवर ताबा मिळवण्यासाठी तालिबानकडून प्रयत्न सुरू आहेत. तालिबानने या प्रांतावर ताबा मिळवल्याचा दावा केला होता. मात्र, अमरुल्लाह सालेह यांनी हा दावा फेटाळून लावला.


चार जिल्ह्यांवर नियंत्रण; तालिबानचा दावा

पंजशीरमधील संघर्षाबाबत आणि तालिबानकडून परस्परविरोधी दावे करण्यात येत आहे. पंजशीरमध्ये जोरदार कारवाई सुरू असून खिंज आणि उनाबा जिल्ह्यांवर ताबा मिळवला असल्याचा दावा तालिबानने केला आहे. पंजशीरची राजधानी बाजारक आणि प्रांतीय राज्यपाल भवनाच्या परिसराकडे जाणाऱ्या मार्गांवर भुसुरुंग असल्यामुळे कारवाईला वेळ लागत असून सात पैकी चार जिल्ह्यांवर ताबा मिळवला असल्याचा दावा तालिबानने केला आहे.

तर, नॉर्दर्न अलायन्सचे नेते अहमद मसूद यांनी शेवटच्या क्षणापर्यंत लढणार असल्याचे जाहीर केले आहे. पंजशीर तालिबानी दहशतवाद्यांविरोधात मजबुतीने उभा असल्याचे त्यांनी म्हटले.

सरकार स्थापना अधांतरी
अफगाणिस्तानमध्ये सत्तास्थापन करण्याचा निर्णय तालिबानने आठवडाभरासाठी पुढे ढकलला आहे. आंतरराष्ट्रीय समूहाची मान्यता मिळू शकेल, असे सर्वसमावेशक सरकार स्थापन करण्याचा तालिबानचा प्रयत्न आहे, अशी माहिती प्रवक्ता झैबीउल्लाह मुजाहिद याने शनिवारी दिली.

दरम्यान, पाकिस्तानच्या आयएसआयप्रमुखांनी शनिवारी अफगाणिस्तानची राजधानी काबूलला अचानक भेट दिली. पाकिस्तानच्या दोन अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. जनरल फैज हमीद यांनी तालिबानच्या नेतृत्वाशी केलेल्या चर्चेच तपशील उपलब्ध झालेला नाही. मात्र तालिबानींवर आयएसआयचा निश्चित प्रभाव आहे. तालिबान्यांचे पाकिस्तानात मुख्यालय असून त्यांचा आयएसआयशी थेट संबंध असतो.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here