म. टा. प्रतिनिधी, मुंबई

राज्याचे यांचे कुटुंबीय आता सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) लक्ष्यावर आले आहे. पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील जमीन खरेदीप्रकरणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर आता खडसे यांना ‘ईडी’कडून पुन्हा एकदा चौकशीचा समन्स बजावला जाण्याची शक्यता आहे. या आरोपपत्रात खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नी मंदाकिनी, अटकेत असलेले जावई गिरीश चौधरी व मुद्रांक शुल्क निरीक्षकही आरोपी आहेत.

खडसे यांनी महसूलमंत्री असताना ३१ कोटी रुपयांची जमीन अवघ्या ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली होती. त्यामध्ये राज्य सरकारच्या महसुलाचे नुकसान झाले होते. त्याशिवाय यामध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरव्यवहार झाल्याचे ‘ईडी’च्या तपासात समोर आले आहे. त्याआधारेच ‘ईडी’ ने आरोपपत्र दाखल केले आहे. एकीकडे जावई अटकेत असताना आता या आरोपपत्रामुळे खडसे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

‘खडसे यांनी महसूलमंत्री या नात्याने पदाचा गैरवापर करीत मुद्रांक शुल्क सह निबंधकांवर दबाव आणला. त्याद्वारे भोसरी औद्योगिक वसाहतीतील ३१.१० कोटी रुपये बाजारमूल्य असलेली जमीन फक्त ३.७५ कोटी रुपयांना विक्री केली. यासाठी बेंचमार्क बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड या बनावट कंपनीची स्थापना करण्यात आली. या कंपनीतून खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना २ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले. त्यानंतर ही जमीन गिरीश चौधरी व मंदाकिनी एकनाथ खडसे यांच्या नावे खरेदी करण्यात आली. त्यामुळे स्वत: एकनाथ खडसे यांच्यासह मंदकिनी खडसे व गिरीश चौधरी यांचेही आरोपपत्रात नाव आहे. त्याखेरीज या व्यवहारात खडसे यांना मदत करणारे तत्कालिन मुद्रांक शुल्क निबंध रविंद्र मुळे यांनाही आरोपी करण्यात आले आहे’, असे ‘ईडी’ तील सूत्रांचे म्हणणे आहे.

या आरोपपत्रानंतर आता ‘ईडी’ ने पुन्हा एकदा एकनाथ खडसे व मंदकिनी खडसे यांच्या चौकशीचा समन्स बजाण्याची तयारी सुरू केली आहे. समन्स बजावल्यानंतर संबंधित संशयित आरोपी गैरहजर राहण्याची शक्यता असते. तसे होऊ नये यासाठी आधीच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here