क्वेटा: बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटामध्ये रविवारी सकाळच्या सुमारास आत्मघाती स्फोट झाला. या हल्ल्यात तीन जवान ठार झाले असून २० जण जखमी झाले आहेत. क्वेटातील मास्टंग रोडमध्ये हा स्फोट झाला. आत्मघाती हल्ल्यानंतर तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आल्याचे वृत्त पाकिस्तानमधील ‘जिओ टीव्ही’ने दिले आहे. जखमींना उपचारासाठी शेख जैद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही. हा आत्मघाती हल्ला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. घटनास्थळी बॉम्बनाशक पथक दाखल झाले आहे. स्फोटातील काही जखमींची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.

एका मोटरसायकल स्वाराने चेकपोस्टवर असलेल्या सुरक्षा दलाच्या वाहनाला धडक दिली आणि त्यानंतर हा स्फोट झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.

याआधी आठ ऑगस्ट रोजी क्वेटातील प्रसिद्ध सेरेना हॉटेलजवळ एक स्फोट झाला. या स्फोटात कमीत कमी आठजण ठार झाले होते. याच हॉटेलच्या वाहनतळ भागात २२ एप्रिल रोजी बॉम्बस्फोट झाला. त्यावेळी हॉटेलमध्ये चिनी राजदूत वास्तव्यास होते. सुदैवाने स्फोट झाला तेव्हा चिनी राजदूत हॉटेलबाहेर गेले होते. या हल्लात पाच जण ठार झाले होते. तर, जवळपास १२ जण जखमी झाले होते.

बलुचिस्तानमध्ये चिनी नागरिक, अभियंते-कर्मचाऱ्यांनाही लक्ष्य केले जात आहे. मागील काही महिन्यांपासून त्यांच्यावर हल्ले वाढले आहेत. चीन-पाकिस्तान सरकारच्या सीपीईसी प्रकल्पाला बलुच बंडखोरांनी विरोध केला आहे. या विरोधातून हल्ले होत असल्याचा दावा पाकिस्तानच्या तपास यंत्रणांनी केला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here