मुंबईः ‘राज्यात अनेकजण घाईने अनेक गोष्टी उघडण्यासाठी आग्रह धरत आहेत. पण ही घाई सर्वसामान्यांच्या अडचणी वाढवणारी आहे. राजकारण आपल्या सर्वांचे होते, पण जीव जनतेचा जातो. जनतेच्या जीवाशी खेळू नका,’ असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला आहे.

करोनाची संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी कोविड राज्य कृतीदलाने आयोजित केलेल्या ‘माझा डॉक्टर’ या ऑनलाइन परिषदेचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी करोनाचे नियम पाळण्याचे नागरिकांना आवाहन केलं आहे. तसंच, राज्यात सध्या मंदिरांवर असलेल्या निर्बंधांवरुन विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. त्यावरुन मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.

‘राज्यात अनेकजण घाईने अनेक गोष्टी उघडण्यासाठी आग्रह धरत आहेत. पण ही घाई सर्वसामान्य जनतेच्या अडचणी वाढवणारी, त्यांचे आरोग्य धोक्यात आणणारी तर नाही ना याचा विचार सर्वांनीच करायला हवा. अगदी राजकारण्यांनीही, आम्ही ही हा विचार करायला हवा. राजकारण आपल्या सर्वांचं होतं, पण जीव जनतेचा जातो. जनतेच्या जीवाशी खेळू नका. आंदोलन करायचे तर करोना विरुद्ध करा,’ असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

‘आता सणवाराचे दिवस सुरु आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत आता अनेक गोष्टी आपण खुल्या केल्या आहेत. गेल्यावर्षी सणवारानंतर, गणेशोत्सवानंतर दुसरी जोरदार लाट आली. यावर्षी रुग्णसंख्या याआधीच वाढतांना दिसत आहे. त्यामुळे गर्दी होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आपल्याला तिसरी लाट येऊ द्यायची नाहीच. ती थोपवायची आहे. राज्यातील नागरिकांनी ही लाट थोपवायची की तिला निमंत्रण द्यायचे हे ठरवावे,’ असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

‘आज करोनाची स्थिती नियंत्रणात असली तरी दुसरी लाट पूर्णपणे ओसरलेली नाही आणि तिसऱ्या लाटेचा धोका सांगितला जात आहे. जगभरात तिसऱ्या लाटेचे थैमान सुरु आहे अशा परिस्थितीत वेळीच उपाययोजना करणे आवश्यक. तिसरी लाट आलीच तर त्याची घातकता कमी व्हावी हा त्यामागचा प्रयत्न आहे. आपला शत्रू अजून पूर्णपणे पराभूत नाही. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहणे आवश्यक आहे,’ असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here