: सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न दुधना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे. यामुळे शनिवारी रात्री आठ वाजेपासून धरणाची दोन ते १४ दारे टप्प्याटप्प्याने उघडण्यात आली. रविवारी दुपारी अडीच वाजता एकूण १४ दरवाज्यातून ३० हजार २६८ क्युसेक्स दराने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

धरणाचे दोन दरवाजे बुधवारी दोनच्या सुमारास ०.३० मीटरने उघडून त्याद्वारे एकूण २ हजार १७४ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. शुक्रवारी सकाळी हा विसर्ग थांबवण्यात आला. पुन्हा धरणाच्या जलाशय पातळीत वाढ झाल्याने शनिवारी रात्री आठ वाजता दोन दारातून विसर्ग सुरू करण्यात आला.

रविवारी सकाळी साडेचार वाजता जलाशय पाणीपातळी ४२६.२८० मीटर, तर जिवंत पाणीसाठा ९८.३४ टक्क्यांवर पोहोचला. त्यामुळे जलाशय परिचालन आराखड्यानुसार द्वार क्रमांक एक ते तीन व १८ ते २० हे ०.३० मीटरने उघडून त्याद्वारे एकूण ६ हजार ५२२ क्युसेक्स विसर्ग करण्यात आला. मात्र धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. सकाळी सहा वाजेपर्यंत जलाशय पातळी ४२६.३०० मीटर, तर जिवंत पाणीसाठा २३९.३२४ दलघमी (९८.८१ टक्के) झाला.

त्यामुळे सकाळी सात वाजता द्वार क्रमांक चार, पाच, सोळा व सतरा, तर साडे सात वाजता द्वार क्रमांक सहा, सात, चौदा व पंधरा ०.३० मीटरने उघडून एकूण चौदा दरवाज्यातून १५ हजार २१८ क्युसेक्स दराने विसर्ग वाढवण्यात आला, तर साडे आठ वाजता पुन्हा द्वार क्रमांक एक ते चार व सतरा ते वीस ०.६० मीटरने उघडून २३ हजार ८०६ क्युसेक्स , तर साडे नऊ वाजता द्वार क्रमांक आठ व तेरा ०.३० मीटरचे उघडून २५ हजार ९७६ क्युसेक्सपर्यंत नदीपात्रात विसर्ग वाढविण्यात आला.

दुपारी अडीच वाजता द्वार क्रमांक एक ते सहा आणि पंधरा ते वीस ही दहा दरवाजे ०.६० मीटरचे उघडून विसर्ग वाढवण्यात आला आहे. सद्यस्थितीत एकूण चौदा दरवाज्यातून ३० हजार २६८ ( प्रति सेकंद ८ लाख ५६ हजार ८८७ लिटर ) विसर्ग सुरू आहे.

दरम्यान, पाण्याची आवक पाहता विसर्ग कमी जास्त करण्यात येईल, त्यामुळे नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा दिलेला आहे, अशी माहिती निम्न दुधना प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाने दिली.

सरासरीपेक्षा ११९ मिमी अधिक पाऊस
रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत धरणक्षेत्रात ८१९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जो सरासरीपेक्षा ११९ मिलीमीटर अधिक आहे. सकाळी सहा वाजेपर्यंत ८.५४१ दलघमी, तर एकूण २२३.९५० दलघमी पाणी धरणात आले. तर आतापर्यंत सोळा वेळा दोन ते चौदा दरवाजे उघडून एकूण ९५.८३९ दलघमी, तर रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत ३.९८९ दलघमी पाणी नदीपात्रात सोडण्यात आलं आहे. दरम्यान गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून रविवारी सायंकाळीही ढगाळ वातावरण कायम आहे.

वाहतूक ठप्प, पिकांचे नुकसान
निम्नदुधना धरणातून मोठा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील छोट्या मोठ्या नदी नाल्यांना पूर आला आहे. ठिकठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. सेलू- देवगाव फाटा रस्त्यावर मोरगाव जवळील दुधना नदीच्या जुन्या पुल पूर्णतः पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे शेताशेतात पाणी साचले आहे. पिके पिवळे पडली आहेत. सोयाबीन, कापूस आदी पिकांचं मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here