: विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याच्या तक्रारीनंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आटपाडी येथील एका प्राध्यापकाला काळे फासलं आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला हा धक्कादायक प्रकार घडला. काळे फासलेल्या शिक्षकाचं नाव विकास बोडरे असं असून या प्राध्यापकास तातडीने निलंबित करावं, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आटपाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्राध्यापक विकास बोडरे यांनी महाविद्यालयातील काही विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याच्या तक्रारी विद्यार्थिनींनी पालकांकडे केल्या होत्या. पालकांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना याची माहिती दिली. यानंतर शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आणि विद्यार्थिनींचे पालक प्राध्यापकास जाब विचारण्यासाठी कॉलेजमध्ये पोहोचले. कॉलेजमध्ये घोषणाबाजी करत त्यांनी प्राध्यापक विकास बोडरे यांच्या तोंडाला काळे फासले.

विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याची कबुली प्रा. बोडरे यांनी दिल्याचं विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. मात्र कॉलेज प्रशासन आणि प्रा. बोडरे यांनी याबाबत अद्याप त्यांची बाजू मांडलेली नाही. प्राध्यापक बोडरे यांचे कृत्य निंदनीय असून, रॅगिंग आणि लैंगिक शोषणाचा गंभीर प्रकार घडला असावा, अशी शक्यता विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी वर्तवली आहे.

प्रा. बोडरे यांना काळे फासल्यानंतर विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालय बंद ठेवण्याचा आग्रह धरला. यासाठी प्राचार्यांच्या केबिनबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. प्रा. बोडरे यांना निलंबित करण्याचं निवेदनही प्राचार्यांकडे देण्यात आलं आहे.

दरम्यान, यावेळी विद्यार्थी परिषदेचे जिल्हा सहसंयोजक विशाल जोशी, बाहुबली छत्रे, विश्वजीत भोसले, अवधूत नलवडे, साहिल शिकलगार, मुजम्मिल शेख आदी उपस्थित होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here