नीतेश राणे यांनी जावेद अख्तर यांना एक खुलं पत्रच लिहिलं आहे. त्यात त्यांनी अख्तर यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. ‘अख्तर यांनी संघाची तालिबानी दहशतवाद्यांशी केलेली तुलना हे एक नियोजनबद्ध कटकारस्थान आहे. ते तालिबानी राजदूत असल्यासारखे वागत आहेत. हिंदुत्ववाद्यांशी तुलना करून अख्तर यांना तालिबानचं उदात्तीकरण करायचं आहे. हिंदुत्वाबद्दल त्यांच्या मनात इतका द्वेष का भरलाय कळायला मार्ग नाही,’ असं नीतेश यांनी पत्रात म्हटलं आहे.
हिंदुत्वानं नेहमीच सर्वसमावेशकतेला स्थान दिलं आहे. त्यामुळंच भारतात वेगवेगळ्या संस्कृती बहरल्या. हिंदुत्व ही एक जीवनपद्धती आहे. भारतात राहणारा या भूमीवर प्रेम करणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे असं संघ मानतो, असं नीतेश यांनी म्हटलं आहे. अख्तर यांच्या हिंदुत्वाबद्दलच्या अभ्यासाची त्यांनी खिल्ली उडवली आहे. हस्तीदंती मनोऱ्यात राहून अख्तर हे देशाकडं पाहतात. तसं नसतं तर संघ करत असलेली सामाजिक व शैक्षणिक कामे त्यांना दिसली असती,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.
‘अख्तर यांनी संघाबद्दल जे वक्तव्य केलं आहे, ते कसं योग्य आहे हे त्यांनी सिद्ध करावं. त्यासाठी आम्ही त्यांना एक आठवड्याचा वेळ देत आहोत. कोणतंही सार्वजनिक व्यासपीठ किंवा न्यूजरूम त्यांनी निवडावा. आम्ही त्यांचा द्वेषपूर्ण अपप्रचार खोडून काढण्यास तयार आहोत. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यास तयार आहोत. आमच्यासाठी चर्चा करायची नसल्यास त्यांनी सर्व हिंदूंची विनाअट माफी मागावी,’ अशी मागणी नीतेश राणे यांनी केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times