बेळगाव: कर्नाटक, महाराष्ट्रासह दिल्लीकरांचंही लक्ष लागलेल्या बेळगाव महापालिका निवडणुकीत अखेर भारतीय जनता पक्षानं बाजी मारली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीला पराभवाची धूळ चारत भाजपनं बेळगाव महापालिका ताब्यात घेतली आहे. महापालिका जिंकण्याचा दावा करणारी एकीकरण समिती थेट चौथ्या स्थानावर फेकली गेली आहे. सीमा भागातील मराठी भाषिकांसाठी हा धक्का मानला जात आहे. (BJP Wins Election)

कर्नाटकात मुख्यमंत्री बदल झाल्यानंतर ही पहिली मोठी निवडणूक होती. त्यामुळं भाजपनं इथं जोर लावला होता. त्यातच महाराष्ट्र एकीकरण समितीनं मराठी भाषिकांच्या बळावर रणशिंग फुंकलं होतं. बेळगाव भगवा ध्वज फडकेल, असा विश्वास शिवसेनेनंही व्यक्त केला होता. मात्र, प्रत्यक्षात चित्र उलट आहे. ५८ सदस्यांच्या बेळगाव महापालिकेत भाजपनं तब्बल ३५ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व राखलं आहे. काँग्रेसला दहा जागा मिळाल्या आहेत. आठ जागांवर अपक्ष निवडून आले आहेत. तर महाराष्ट्र एकीकरण समितीला अवघ्या चार जागांवर समाधान मानावं लागलं आहे. एमआयएमचा एक उमेदवार विजयी झाला आहे.

मागील महापालिका सभागृहात महाराष्ट्र एकीकरण समितीचे तब्बल ३२ सदस्य होते. यावेळी सर्व मराठी भाषिक समितीच्या पाठीशी एकवटलेले दिसत असतानाही समितीची मोठी घसरण झाली आहे. मराठी भाषिकांसाठी हा धक्का मानला जात आहे. बेळगाव महापालिकेच्या महापौर निवडणुकीत खासदार आणि आमदारांनाही मतदानाचा अधिकार आहे. सध्या बेळगावमध्ये भाजपचे दोन खासदार आणि दोन आमदार आहेत. त्यामुळं महापालिकेत भाजपचा महापौर बसणार हे निश्चित आहे.

बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांनी प्रथमच पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढवल्या होत्या. भाजप आणि काँग्रेस पक्षानं सगळ्या प्रभागात आपले उमेदवार उभे केले होते. त्यात भाजपनं बाजी मारली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here