गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्ष मंदिरं उघडण्याची व सण-उत्सव साजरा करण्याची मागणी करत आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर सध्याच्या परिस्थितीकडं लक्ष वेधत मुख्यमंत्र्यांनी सर्वांनाच आवाहन केलं आहे. ‘ संसर्गात थोडीशी वाढ दिसत आहे. मागील अनुभव लक्षात घेऊन सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांनी गर्दीचे कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करावेत. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करावेत. आपल्याला तिसरी लाट येऊच द्यायची नाही, जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
‘हे उघडा, ते उघडा’ या मागण्या ठीक आहेत, पण त्यातून धोका वाढला आहे. प्रत्येकानं नियम आणि मर्यादा पाळल्या तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही. त्यामुळं सगळ्यांनीच शहाणपणानं वागून लोकांच्या जिवाचं रक्षण करायला हवं. सण, उत्सव आज झाले नाहीत तर उद्या नक्की येतील, पण घरातला प्रत्येक माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. लोकांच्या जिवावरील विघ्न टाळायचे असेल तर, शासनाने वेळोवेळी आखून दिलेल्या आरोग्याच्या नियमांचे पालन होईल हे काटेकोरपणे पहा, गर्दी करू नका. सार्वजनिक कार्यक्रम टाळा. राजकीय सभा, संमेलनांना उत्तेजन देऊ नका. येणारे दिवस आव्हानत्मक आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नसेल तर राजकीय पक्षांवर त्याची प्रमुख जबाबदारी आहे. सरकार सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा निर्माण करील, पण त्याचा वापर करण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रयत्न करा, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times