मुंबई: मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक दिग्गजांनी सोडचिठ्ठी दिल्यामुळं एकाकी पडलेल्या, तरीही अनपेक्षितरित्या ‘कमबॅक’ करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आतापासूनच सावध होत पुढील तयारी सुरू केली आहे. त्यामुळंच की काय, विद्यमान आमदारांसोबतच मागील निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक राष्ट्रवादीनं बोलावली आहे. पक्षाचे अध्यक्ष स्वत: या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक आमदार, खासदार व वजनदार नेत्यांनी पक्ष सोडला होता. पुन्हा सत्ता येणार नाही हे लक्षात आल्यामुळं या सर्व नेत्यांची भाजपच्या तंबूत आसरा घेतला होता. जिल्ह्याजिल्ह्यातले तालेवार नेते ऐनवेळी सोडून गेल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसला व शरद पवारांनाही धक्का बसला होता. त्यामुळं निवडणुकीला सामोरं जाताना पक्षाची अवस्था दयनीय झाली होती. अनेक ठिकाणी चांगले उमेदवार मिळवणं कठीण झालं होतं. अशा परिस्थितीत शरद पवारांनी जिद्दीनं प्रचाराचा किल्ला लढवत वातावरण फिरवलं व पक्षाची घसरण थांबवली. निकालानंतर ‘किंगमेकर’ची भूमिका बजावत शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं व भाजपला सत्तेबाहेर फेकलं. मागील वेळी ओढवलेली परिस्थिती भविष्यात ओढवू नये म्हणून राष्ट्रवादी आतापासूनच कामाला लागली आहे. त्यासाठीच पक्षाच्या विजयी आणि पराभूत उमेदवारांची बैठक बोलावण्यात आल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा:

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री यांनी बैठकीबाबतची माहिती दिली. त्यानुसार, बुधवार, ८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ही बैठक होणार आहे. या बैठकीत विजयी व पराभूत उमेदवारांच्या मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे, असं मलिक यांनी सांगितलं.

महापालिका निवडणुकांवरही लक्ष

पुढील वर्षी मुंबई, पुणे, नाशिक, पिंपरी-चिंचवडसह अनेक मोठ्या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यापैकी पुणे, पिंपरी-चिंचवड येथील सत्ता ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे. तर, नाशिकसह अन्य महापालिकांमध्ये पक्षाला स्वत:चा प्रभाव वाढवायचा आहे. आजी-माजी आमदारांची बैठक त्या दृष्टीनं महत्त्वाची ठरणार आहे. या बैठकीत शरद पवार नेमकं काय मार्गदर्शन करतात, याबद्दल उत्सुकता आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here