: तालुक्यातील धुंडेशिवणी गावापासून दीड किमी अंतरावर वाघाच्या हल्ल्यात ६५ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली आहे. नामदेव गुडी असं मृतकाचे नाव असून तो धुंडेशिवणी येथे राहत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव हे दुपारी १२ वाजताच्या दरम्यान बैलांची पूजा करण्यासाठी बेलपत्र तथा पत्रावळीसाठी कुड्याची पाने आणायला आपल्या एका सहकाऱ्यासह गावापासून साधारणतः दीड किमी अंतरावरील वनविकास महामंडळाच्या अख्त्यारीत असलेल्या पोर्ला वनपरिक्षेत्रातील चुरचूरा बीट मधील कक्ष क्र १ मध्ये गेले होते. पान तोडत असतानाच साधारणतः १२.३० ते १ वाजताच्या दरम्यान अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. त्याचा सहकारी जवळच असल्याने तो या हल्ल्याने भयभीत होऊन जोराने ओरडला. त्यामुळे वाघ तिथून पळून गेला. थोडक्यात वाचलेल्या सहकाऱ्याने लगेच घटनेचं वृत्त गावात दिलं.

वनविकास महामंडळाचे सहाय्यक वनसंरक्षक अमोल नागे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील कारवाई केली. दरम्यान मृतकाच्या कुटुंबियांना अंतिम संस्काराकरीता २५ हजार रूपयांची सानुग्रह रक्कम वनविकास महामंडळाच्या वतीने देण्यात आली आहे. सहाय्यक वनसंरक्षकांनी सांगितलं की, घटनेच्या ठिकाणी दोन कॅमेरे लावण्यात आले असून सदर हल्ला करणारा वाघ हा वनविभागाकडून ओळख पटवण्यात आलेला तोच नरभक्षी वाघ आहे काय, याचा शोध घेतला जाणार आहे.

दरम्यान, नरभक्षी आणि इतर वाघांचा पोर्ला वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वावर असून वनविभागाने या भागात भरपूर जनजागृती केली आहे. नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे, कामाव्यतिरीक्त अन्य लहानसहान कामासाठी जंगलात जाऊ नये, गल क्षेत्रालगत असलेल्या शेतांमध्ये मोठ्या गटाने जावे, अशा सर्व प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here