नवी दिल्लीः हरयाणाच्या कर्नालमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पाण्याच्या तोफांचा मारा केला गेला, याचा निषेध काँग्रेसने केला आहे. तसंच तालिबानशी चर्चा करणारे नरेंद्र मोदी सरकार देशातील शेतकऱ्यांशी चर्चा का करत नाहीए, असा सवालही काँग्रेसने केला आहे. पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलवावं आणि तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा करावी, असं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले. गेल्या १० महिन्यांपासून गांधीवादी मार्गाने आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना जाणूनबुजून भडकवून आणि आपसात लढवण्याचा कट रचत आहे. हा कट इथेपर्यंतच मर्यादित नाही. तर जवान आणि शेतकऱ्यांमध्ये जुंपवून देण्याचं षड्यंत्र रचलं आहे. कर्नालमध्ये हजारो शेतकऱ्यांवर पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा केला गेला. पण शेतकऱ्यांनी संयम सोडला नाही, असं सुरजेवाला म्हणाले.
मोदीजी, तुम्ही दोहामध्ये (कतार) तालिबानशी चर्चा करू शकतात. तर मग दिल्लीच्या सीमेवर १० महिन्यांपासून बसलेल्या अन्नदातांशी बोलत का नाहीए? हा सत्तेचा अहंकार कशासाठी?, असा सवाल त्यांनी केला. शेतकऱ्यांना आपलं पिक आणि आपली पुढची पिढी वाचवायची आहे. पण मोदीजी आपल्या उद्योगपती मित्रांची तिजोरी भरत आहेत. ही लढाई देश वाचवण्यासाठी, जेणेकरून मोदी सरकार ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणे देशाला गुलाम बनवू शकत नाही, असं सुरजेवाला म्हणाले. नरेंद्र मोदींनी कामं सोडून शेतकऱ्यांची चर्चा करावी. मोदी स्वतः शेतकऱ्यांशी बोलावं आणि तिन्ही कृषी कायदे आज रात्रीतच रद्द करण्याची घोषणा करावी, असं रणदीप सुरजेवाला म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times