खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष या महत्त्वाच्या पदावर कार्यरत असताना गैरवर्तन, अनियमितता आणि कर्तव्यात कसूर केलेली असल्याची तक्रार शिवसेनेचे गटनेते प्रज्योत तोडकरी, उपनगराध्यक्ष सुनील बाबुराव दरेकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी केली होती. तसंच याबाबत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली आणि चौकशी करुन चौकशी अहवाल आपल्या अभिप्रायांसह जिल्हाधिकाऱ्यांनी शासनास सादर केला आहे.
नगराध्यक्षांवर काय आहेत आरोप?
खेड नगरपरिषद हद्दीतील नगरोत्थान (जिल्हास्तर) या योजनेअंतर्गत केलेल्या विकास कामांच्या अंतिम बिलावर विहीत पद्धतीने कार्यवाही न करता काही अंतिम देयकांवर मुख्याधिकारी व संबंधित विभागप्रमुख यांच्या स्वाक्षरी नसताना एकट्याने स्वाक्षरी केली आहे. १५ टक्के सहायक अनुदान अंतर्गत विकास कामांच्या करारनाम्यावर नगरसेविका मानसी चव्हाण या स्थायी समिती सदस्य नसताना त्यांच्यासह स्वाक्षरी करुन पदाचा गैरवापर केला आहे. यासोबतच आणखी काही आरोपांत तथ्य असल्याचं नगर विकास विभागाने नोटीसीमध्ये म्हटलं आहे.
‘हे माझ्याविरोधात शिवसेनेचे षडयंत्र’
सगळ्या आरोपांबाबत खेडचे नगराध्यक्ष तथा मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की, ‘हे सगळं आपल्याला राजकारणातून संपवण्यासाठी शिवसेनेने आखलेलं षडयंत्र आहे. आगामी निवडणुकीतून आपल्याला बाद करावे यासाठी हे सगळे चालू आहे. पण या सगळ्याला आपण योग्य ते उत्तर देऊ,’ अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी बुधवारी सायंकाळी दिली आहे.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times