म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची खासदार यांनी दिशाभूल केली. खासदारांकडून माझ्या जीवाला धोका असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख हरीश सारडा यांनी केल्याने वाशीम जिल्ह्यातील गृहकलह विकोपाला गेला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भावना गवळी यांनी भेट घेतल्यानंतर सारडा यांनी थेट नागपूर गाठून पत्रकार परिषद घेतली. माझ्यावर यापूर्वीही दोन वेळा हल्ले झाले. धमकी देण्यात येत आहे. पोलिसांनी सुरुवातीला संरक्षण दिले आणि नंतर काढून घेतले. पोलिस उपअधीक्षकांनी मोबाइल जप्त केला. अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. गवळी यांनी वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथील शंभर कोटी रुपयांचा श्री बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड कारखाना २५ लाख रुपयात खरेदी केला. त्यांचे खासगी सचिवांच्या भावना अॅग्रो प्रॉडक्ट अॅण्ड सर्व्हिसेसच्या नावावर हा व्यवहार झाला. हा घोटाळा उघडकीस आणल्यापासून धमक्यांचे फोन येत आहेत. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरही अद्याप कारवाई झाली नाही. पोलिसांची खासदारांना साथ लाभली आहे. त्यांच्याकडून जीवाला धोका असल्याचे सारडा म्हणाले.

पवार यांनी गवळी यांची बाजू घेतली नाही. ईडीच्या कारवाईबाबत गवळींनी खोटी माहिती देऊन पवारांची दिशाभूल केली. गवळी यांच्या १२ संस्था व ७ कंपन्या आहेत. ३ कंपन्यांच्या संचालक आहेत. ही माहिती त्यांनी दडवली. सरकार वा पक्षाचे त्यांना कोणतेही समर्थन लाभलेले नाही. मोठ्या नेत्यांचा आधार मिळावा, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. राज्याच्या एका ज्येष्ठ नेत्याची दिशाभूल केल्याबद्दल गवळी यांनी शिवसैनिक तसेच, मतदारसंघ व राज्यातील जनतेची माफी मागावी, अशी मागणीही सारडा यांनी केली.

सोडलेली नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचीही गवळी यांनी दिशाभूल केली. पाटील यांना त्यांनी खोटे पत्र दिल्यानंतर चौकशी बंद करण्यात आली. उच्च न्यायालयातील याचिकेतही पाटील यांना पक्ष करण्यात येईल. गवळी यांनी आरोप सिद्ध केल्यास महाराष्ट्र सोडू, अन्यथा त्या खासदारकीचा राजीनामा देतील का, असे आव्हानही सारडा यांनी दिले. खासदारांच्या इशाऱ्यावरून माझ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. १७ नाही तर, पाच गुन्हे दाखल आहेत. यातील अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा असून चार गुन्हे आयटीशी संबंधित आहे. यावर्षीच्या आधीचा एकही गुन्हा नाही, असा दावाही हरीश सारडा यांनी केला. शिवसेना सोडलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here