सांगली : सांगली महानगरपालिकेत सत्तांतर घडवण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले असले तरी, स्थायी समितीचा ताबा घेण्यात पुन्हा एकदा दोन्ही काँग्रेसला अपयश आले आहे. गुरुवारी झालेल्या स्थायी समिती सभापती निवड प्रक्रियेत भाजपाचे निरंजन आवटी यांची वर्णी लागली. सभापती निवडीसाठी झालेल्या ऑनलाईन मतदानात ९- ७ मतांनी आवटी यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला. स्थायी समिती सभापती निवडणुकीत दोन्ही काँग्रेसचा पराभव झाल्याने महापालिकेतील भाजपचे वर्चस्व कमी करण्याच्या दोन्ही काँग्रेसच्या मोहिमेला ब्रेक लागला आहे.

सांगली महापालिकेतील स्थायी समिती सभापती पदाची मुदत संपल्याने गुरुवारी नवीन सभापतींसाठी ऑनलाईन मतदान घेण्यात आले. यावेळी ऑनलाईन पद्धतीने झालेल्या मतदानात भाजपचे उमेदवार निरंजन आवटी यांना ९ तर काँग्रेसचे उमेदवार फिरोज पठाण यांना ७ मते मिळाली.

त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र दुडी यांनी निरंजन आवटी यांना सभापती म्हणून घोषित केले. यावेळी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, नगर सचिव चंद्रकांत आडके आदी उपस्थित होते. निवडीनंतर महापालिकेबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

राज्यातील सत्ता बदलानंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि कृषी राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांनी सांगली महापालिकेत बहुमताची गोळाबेरीज करून भाजपला सत्तेतून बाहेर खेचले. यानंतर स्थायी समितीचा ताबा घेण्यासाठी दोन्ही मंत्र्यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र अजूनही यात काँग्रेसच्या नेत्यांना यशाची हुलकावणी मिळत आहे. स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे यांची मुदत संपल्याने गुरुवारी नवीन सभापती निवडीसाठी ऑनलाइन मतदान घेण्यात आले.

या पदासाठी भाजपकडून निरंजन आवटी, तर काँग्रेसकडून फिरोज पठाण यांनी अर्ज दाखल केले होते. ऑनलाइन मतदान प्रक्रियेत आवटी यांनी नऊ मते मिळवत बाजी मारली, तर पठाण यांना सात मते मिळाली. निवडणूक निकालानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांना महापालिकेबाहेर आनंदोत्सव साजरा केला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here