: कॅन्सर झालेल्या रुग्णाला तुझा आजार बरा करून देतो, असं सांगून २ लाख ५१ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. ही घटना बारामती शहरातील असून याप्रकरणी मनोहर मामा भोसले (रा.उंदरगांव, ता.करमाळा, जि सोलापूर) याच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी शशिकांत खरात (रा.साठेनगर, बारामती) यांनी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

फिर्‍यादीनुसार, खरात यांच्या वडिलांना थायरॉईड कॅन्सर हा दुर्धर आजार झाला आहे. त्यामुळे खरात हे मनोहरमामा भोसले (भोंदूबाबा) च्या मौजे सावंतवाडी, गोजूबावी (ता बारामती) मठामध्ये गेले. त्याने तुमच्या वडिलांचा कॅन्सरचा आजार बरा करतो, असं सांगून शशिकांत खरात यांना त्यावरील औषध म्हणून बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिला.

तसंच विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा व ओंकार शिंदे यांच्यासोबत संगनमत करून वेळोवेळी चढावा, अभिषेक व भेटीसाठी खरात यांच्याकडून एकूण २ लाख ५१ हजार ५०० रुपये घेतले. मनोहर भोसले हा खरात यांना त्यांच्या वडिलांच्या जिवाचं बरं वाईट होईल, अशी भीती घालत असे. तसंच पैसे परत मागितल्यास ठार मारण्याची धमकीही त्याने दिली असल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, मनोहर भोसले हा याआधीही अनेकदा वादात सापडला आहे. आपण बाळूमामाचे अवतार असल्याचे सांगत लोकांची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्यानंतर आता त्याच्यावर दाखल झाल्याने याप्रकरणी पोलीस नेमकी काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here