चिपी विमानळावरून श्रेयवादाची लढाई सुरू आहे. या विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमाला येण्याची शक्यता आहे, याबाबत तुमची भूमिका काय राहील, असा प्रश्न नारायण राणे यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना राणे यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री या उद्घाटन सोहळ्यात आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्वच कार्यक्रमांना आलंच पाहिजे असं काही नाही, असं म्हणणारे नारायण राणे यांनी आता मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची भूमिका घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. भाजपच्या इतर नेत्यांनी मांडलेल्या भूमिकेमुळेच राणेंनी आपला सूर बदलला का, अशीही चर्चा सुरू आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी या उद्घाटनाला यायला हवं, असं भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं होतं.
शिवसेनेनं घेतली होती आक्रमक भूमिका
नारायण राणे यांनी चिपी विमानतळावरून केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली. ‘नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांचं चिपी विमानतळाच्या उभारणीत काहीही योगदान नाही. निलेश राणे यांनी खासदार असताना एकदाही हा प्रश्न संसदेत मांडला नाही. त्यामुळे राणे कुटुंबाने या विमानतळाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये,’ असं विनायत राऊत यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, ९ ऑक्टोबर रोजी चिपी विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हेदेखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहतात की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times